पुणे: दसरा मेळाव्यात शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवावर दोन दिवस छळ केल्याचा आरोप कदम यांनी केला. या आरोपाला ठाकरे सेनेचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी थेट उत्तर दिले असून, कदम यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याची घोषणा केली आहे.

अनिल परब म्हणाले, “बाळासाहेब गेल्यानंतर 14 वर्षांनी कदम यांना कंठ फुटला आहे. बाळासाहेब 2012 मध्ये गेले. त्यानंतर 2014 मध्ये उद्धव ठाकरे यांनी कदम यांना मंत्री केले. उद्धव ठाकरे इतके वाईट होते तर 2014 ला त्यांनी मंत्रीपद का स्वीकारले? 2014 ते 2019 पर्यंत मंत्रीपद भूषवलं आणि त्यानंतर 2019 मध्ये आपल्या मुलाला आमदारकी मिळवून दिली. उद्धव ठाकरे व शिवसेनेकडून सर्व काही मिळत असताना ते चांगले होते, पण आता राजकीय फायद्यासाठी आरोप करत आहेत.”

परब यांनी पुढे आरोप करताना म्हटलं की, “1993 मध्ये कदम यांच्या पत्नीने स्वतःला जाळून घेतलं की त्यांना जाळलं, याची चौकशी झाली पाहिजे. खेडमध्ये कोणा-कोणाला बंगले बांधून दिले, वाळू चोरी, डान्सबार, जमिनी लाटणे याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे. कदम यांच्या पुतण्याने आत्महत्या केली, त्यामागचं कारण काय? घरातील लोक आत्महत्या का करत आहेत, याची चौकशी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केली पाहिजे.”

परब यांनी नार्को टेस्टचाही मुद्दा उपस्थित करताना म्हटले, “रामदास कदम यांची मागणी आहे की नार्को टेस्ट करा. आम्हालाही ते मान्य आहे. नार्को टेस्ट झाली तर सत्य बाहेर येईल. त्याचप्रमाणे 1993 च्या प्रकरणाचीही सविस्तर चौकशी व्हावी. मुख्यमंत्री एकीकडे आपली स्वच्छ प्रतिमा ठेवत आहेत, पण अशा मंत्र्यांना का वाचवत आहेत? अशा मंत्र्यांना हाकलून दिलं पाहिजे.”
परब यांनी स्पष्ट केलं की, “आम्ही रामदास कदम यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहोत आणि ती रक्कम पूरग्रस्तांसाठी दान करणार आहोत. या अधिवेशनात पुराव्यांसह सर्व मुद्दे समोर आणणार आहोत.” या सर्व घडामोडीनंतर आता रामदास कदम यांच्याकडून काय उत्तर दिलं जातं, याकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.







