लोणी काळभोर: लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायवाडी येथे सातवीतील विद्यार्थी रामा शंकर पवार याने जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कांस्य अशा तिहेरी पदकांची कमाई केली आहे. रामाने मिळविलेल्या यशाबद्दल त्याच्यावर लोणी काळभोरसह जिल्ह्यातील नागरिकांकडून कौतुकांचा वर्षाव होत आहे. तसेच एका जिल्हास्तरीय स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कांस्य असे तीनही वेगवेगळी पदके पटकाविणारा रामा पवार हा लोणी काळभोरमधील पहिला विद्यार्थी ठरला आहे.
यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव अंतर्गत पुणे जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी संकुलात सोमवारी (ता. 29) पार पडल्या. या स्पर्धेत रायवाडी शाळेतील विद्यार्थी रामा पवार याने सहभाग घेतला होता. रामाने थाळी फेक, धावणे आणि लांब उडी स्पर्धेत सहभाग घेतला होता. रामाने थाळी फेक प्रथम, लांबवडी स्पर्धेत द्वितीय क्रमांक आणि 100 मीटर धावणे या स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला. त्याने अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके मिळवली आहेत. या यशासाठी रामाला शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा भुजबळ व शिक्षक गणेश खाडे यांचे मार्गदर्शन लाभले.
रामाचे वडील शंकर पवार हे एक रिक्षाचालक आहेत तर आई दिवसभरात लोणी काळभोर परिसरात भंगार गोळा करण्याचे काम करते. या दोघांवर त्यांच्या कुटुंबाचा गाडा चालतो. मात्र, दोघांनीही रामाने क्रीडा क्षेत्रात नाव कमवावे, अशी अपेक्षा होती. त्यासाठी ते रामाला नेहमी प्रोत्साहन देत होते. रामाने केलेल्या प्रयत्नांना आज अखेर यश आले आहे. रामाने मिळविलेल्या यशाबद्दल त्याच्यावर जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांकडून कौतुक केले जात आहे. तसेच त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.
तीनही पदके मिळवल्याने आनंद
यावेळी रामा पवार म्हणाला की, ”या स्पर्धेत मिळालेले यश हे आई-वडील व प्रशिक्षकांनी केलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे मिळाले आहे. सुवर्णपदक, रौप्य व कांस्य असे तिन्ही पदके पटकावल्यामुळे खूप आनंद झाला आहे. नातेवाईक व मित्रमंडळी फोन करून शुभेच्छा देत आहेत”.
सुरज सरोज व क्रीडा शिक्षकांचे कौतुक
पुणे जिल्हास्तरीय थाळी फेक, धावणे आणि लांब उडी स्पर्धेत रामाने सुवर्ण, रौप्य व कांस्य असे तिहेरी पदकांची कमाई केली आहे. त्यामुळे सुरज सरोज व त्याला मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षकांवर लोणी काळभोर व परिसरातील नागरिकांकडून कौतुकांचा वर्षाव होत आहे.