लोणी काळभोर : येथील तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय येथे बुधवारी (ता. १७) पहाटेपासूनच रामजन्मोत्सव पारंपारिक पद्धतीने उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, फुरसुंगी गावातील नागरिकांसह पुणे, पिंपरी-चिंचवड, सातारा तसेच परप्रांतातून आलेले भाविक व पर्यटक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. पूर्व हवेलीसह परिसरातील नागरिकांनी हिरीरीने सहभागी होत उत्सवाचा आनंद घेतला. दहावी, बारावीच्या संपलेल्या परीक्षा व रामनवमीनिमित्त असलेल्या सुट्टीमुळे बुधवारी तीर्थक्षेत्र रामदरा येथे ‘न भूतो न भविष्यती’ अशी भाविकांनी पहाटेपासून ते संध्याकाळपर्यंत गर्दी केली होती.
तीर्थक्षेत्र रामदरा शिवालयाचे संस्थापक १००८ देविपुरी महाराज उर्फ धुंदीबाबा यांनी गेल्या ६० वर्षांपूर्वी हे तीर्थक्षेत्र विकसित केले. तेव्हापासून येथे रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास महामस्तकाभिषेक करून श्रींची आरती करण्यात आली. दुपारी ढोल ताशांच्या गजरात ‘श्री’समवेत धुंदीबाबा व मंगलपुरी महाराज यांच्या पादुकांची मिरवणूक काढण्यात आली होती. तरवडी-रानमळा, केसकरवस्ती, वडकी येथील समाजबांधवांनी ‘गजनृत्य’ सादर केले.
दुपारी बारा वाजता महंत हेमंतपुरी महाराज यांच्या हस्ते रामजन्मोत्सवाची आरती करण्यात आली. त्यानंतर भंडारा व महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. पाडव्यापासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची आज सांगता झाली. रामजन्माचा सोहळा झाल्यानंतर भात, आमटी, बुंदीचा महाप्रसाद देण्यात आला. दर्शन व प्रसाद घेण्यासाठी आबालवृद्ध, महिला, तरुण भक्तांची झुंबड उडाली होती.
आरएसएसच्या स्वयंसेवकांकडून मदत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आलेल्या भाविकांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांचे पार्किंग व्यवस्थित व्हावे म्हणून उपाययोजना करत होते. यामुळे आलेली दुचाकी व चारचाकी वाहने मुख्य प्रवेशद्वाराच्या सुमारे एक हजार फूट अलीकडेच थांबवल्याने भाविकांना वाहतूक कोंडीचा त्रास जाणवला नाही. तर काही स्वयंसेवी संस्थांनी मोफत पाण्याची व ज्युसची व्यवस्था केली होती. विश्वराज हॉस्पिटलच्या वतीने रुग्णांची मदत केली. तसेच ओआरएस मोफत दिले.
लोणी काळभोर पोलिसांकडून चोख बंदोबस्त
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यामुळे कसलाही अनूचित प्रकार घडला नाही. रात्री उशिरापर्यंत विविध भागातून भाविक दर्शनासाठी येत होते.रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण व आलेल्या भाविकांना महाप्रसाद देण्याचे काम तीर्थक्षेत्र रामदरा तरुण मंडळाचे सदस्य व स्थानिक तरुणांनी केले.
पीएमपीएमएलच्या वतीने विशेष बससेवा
पीएमपीएमएलच्या वतीने हडपसर ते रामदरा दरम्यान बससेवा सुरू करण्यात आल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले. मात्र, काही ठिकाणी रस्त्याची दुरावस्था झाली असून, रस्ता लवकर रुंदीकरण करावा, अशी चर्चा भाविकांमध्ये चालू होती. अरुंद रस्ता, दुचाकी व चारचाकी वाहनांची व भाविकांची प्रचंड संख्या यामुळे पुणे कोल्हापूर लोहमार्गावरील पूलापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.