पुणे : श्रीराम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेनिमित्त अयोध्येसह देशभरात आनंद साजरा होत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात सजावट करा, ज्योत प्रज्वलित करा असे आवाहन पंतप्रधान मोंदींकडून करण्यात आले आहे. पुण्यातही वेगवेगळ्या माध्यमांतून उत्साह दाखवला जात आहे. कुठे रॅली, सांस्कृतीक कार्यक्रम, स्पर्धांच्या माध्यमातून २२ जानेवारी साजरी करण्याचे सर्वांकडून प्रयत्न आहेत.
अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेनिमित्त मार्केटयार्ड येथील सभागृहामध्ये प्रभू राम यांची भव्य रांगोळी काढण्यात आली. धान्य, कडधान्य, डाळी आणि ड्रायफ्रुटस्ची वापर करून प्रभू राम व राम मंदिराची आकर्षक भव्य रांगोळी काढली गेली. मार्केटयार्ड गुळ भूसार हा अन्न धान्याचा बाजार आहे. अन्न-धान्याचे प्रतीक म्हणून सदरच्या रांगोळीमध्ये धान्य, कडधान्य, डाळी, सुका मेवा यांचा वापर केला आहे.
प्रभू राम व राम मंदिराची आकर्षक भव्य रांगोळी सामेवार( दि. २२) ला सकाळी ११.०० ते सायं. ६.०० वाजेपर्यंत सर्वांना पाहण्यासाठी खुली ठेवण्यात आली आहे. त्याशिवाय, मार्केट यार्डमध्ये सजवलेल्या वाहनांमध्ये शोभा यात्रेचे आयोजन केले असून त्यादरम्यान प्रसादाचे वाटप केले जाणार आहे.