इंदापूर : विरोधकांनी एकही संस्था काढलेली नाही. परंतु, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी संस्था काढल्या. त्या संस्थेला विरोधक जाणूनबुजून बदनाम करण्याचे कटकारस्थान करत आहेत. त्यांनी हे तात्काळ थांबवावे अन्यथा त्यांना जनता त्यांची जागा दाखवून देईल, असा इशारा निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी विरोधकांना दिला.
दोन दिवसांपूर्वी विरोधकांनी आयोजित केलेल्या मेळाव्यामध्ये निरा-भिमा व कर्मयोगी कारखान्याच्या शेतकऱ्यांची बिले व कामगारांचे पगार वेळेवर दिले जात नाहीत, असा आरोप केला होता. त्या आरोपाला राजवर्धन पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, इंदापूर तालुक्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अनेक संस्था काढून तालुक्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला. या संस्थामुळे तालुक्यात आर्थिक सुबत्ता निर्माण झाली. तालुक्याचे अर्थकारण या संस्थावर अवलंबून आहे. मात्र, काही विरोधक जाणूनबुजून या संस्था बदनाम करण्याचे कटकारस्थान करत आहेत.
विरोधकांनी मोकळ्यात बडबड करण्यापेक्षा त्यांनी कामगारांना व शेतकऱ्यांना अगोदर विचारावे की तुमची बिले व कामगारांच्या पगारी वेळेवर होतात की नाहीत याची शहानिशा करावी, असा सल्लाही राजवर्धन पाटील यांनी विरोधकांना दिला. तसेच ज्या कोणाला याची पूर्ण माहिती हवी आहे, त्यांनी कारखान्यावर वेळ काढून यावे, त्या आरोप करणाऱ्या व्यक्तीला पुराव्यानिशी संपूर्ण माहिती देऊ, असेही राजवर्धन पाटील यांनी सांगितले.
स्वत:च्या बुडाखालचा अंधार झाकण्यासाठी खोटे आरोप
खोटे आरोप करणारे लोक किती विद्वान आहेत, हे तालुक्यासह सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या बुडाखालचा अंधार झाकून ठेवण्यासाठी दुसऱ्यावर बेछूट आरोप करू नयेत. स्वर्गीय शंकररावजी पाटील उर्फ भाऊ यांची आम्हाला शिकवण आहे म्हणून आम्ही शांत आहोत. अन्यथा जशास तसे उत्तर देण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असा निर्वाणीचा इशारा राजवर्धन पाटील यांनी विरोधकांना दिला.