दीपक खिलारे
इंदापूर : भाऊंचे नेतृत्व व संस्था तुमच्यासाठी टिकल्या पाहिजेत. सध्या भाऊंना जनतेसाठी अहोरात्र काम करताना, संस्था चालवताना किती त्रास होतो, त्याग करावा लागतो, वेदना होतात हे मी जवळून पाहत आहे, असं म्हणत अचानकपणे नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांना अश्रू अनावर झाले. त्यामुळे राजवर्धन पाटील यांना काही वेळ भाषण थांबवावे लागले. यावेळी भावनिक वातावरणामुळे संपूर्ण सभागृह काहीवेळ स्तब्ध झाले होते.
शहाजीनगर (ता. इंदापूर) येथे निरा भिमा सहकारी साखर कारखान्याची 26 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी (दि. 23) संपन्न झाली. या सर्वसाधारण सभेमध्ये राजवर्धन पाटील यांनी तालुक्याच्या विकासाचे हित डोळ्यासमोर ठेवून केलेले अतिशय विचारी व अभ्यासपूर्ण भाषण सर्वांच्या कायम स्मरणात राहील असेच झाले. कारखान्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये बोलत असताना राजवर्धन पाटील भावनिक झाले. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यानंतर राजवर्धन पाटील यांना भाषण थांबवून पाणी घेतल्यानंतरच पुढील भाषण सुरू करता आले.
राजवर्धन पाटील म्हणाले, खरं सांगतोय.. तुमच्यासाठी, संस्थांसाठी कष्ट, सर्व त्रास भाऊ सहन करीत आहेत. हे सगळं तुमच्यासाठी चालले आहे. मोठे भाऊ, हर्षवर्धनभाऊ, घोलप साहेबांचे विचार पुढे घेऊन आपण जात आहोत. टीका करणे सोपे असते, त्याग करावा लागतो, वेदना होतात. तरी आम्ही खचून गेलेलो नाही. खचून जाणार नाही. सभासद, कर्मचारी, हितचिंतक यांना माहिती आहे की, आंम्ही चुकीचे वागलो नाही आणि वागणार नाही. असा विश्वास राजवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.
राजवर्धन पाटील पुढे म्हणाले, भाऊंच्या पाठीशी प्रामाणिकपणे उभे रहा, विचारांना महत्त्व आहे. इंदापूर तालुक्यामध्ये भाऊंचे नेतृत्वाखाली राजकारण, समाजकारण करीत असलेले बावड्याचे पाटील घराणे तुमच्यासाठी टिकले पाहिजे, असे भावनिक आवाहनही राजवर्धन पाटील यांनी भाषणात केले.
युवा पिढीचे नेतृत्व करीत असलेल्या राजवर्धन पाटील यांच्या करारी परंतु तेवढ्याच प्रेमळ स्वभावाची अनुभूती आजच्या भाषणाने उपस्थित हजारो सभासद, शेतकरी, कामगार, हितचिंतक यांना आली. तसेच राजवर्धन पाटील यांच्या विकासाच्या दूरदृष्टीची व वैचारिक विचारसरणीची जाणीव आज अनेकांना झाली.