पुणे : राष्ट्रवादी काँगेस पक्ष फोडत अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर आता राज्यात शरद पवार आणि अजित पवारांमध्ये जोरदार सामना रंगताना दिसत आहे. दोघेही एकमेकांवर भरसभेत तारेशे ओढताना दिसत आहेत. हे सर्व घडत असताना शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे आमदार राजेश टोपे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सकाळी भेट घेतली आहे. ही भेट पुण्यातील शासकीय विश्रामगृहात झाली. टोपे यांनी अजित पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
आमदार राजेश टोपे हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर ते शरद पवारांच्या गटात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे सर्व नेते सोडून जात असताना शनिवारी सकाळी अजित पवारांची राजेश टोपे यांनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. महत्वाचे म्हणजे या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेत नेमकं काय घडलं? ही भेट नेमकी कशासाठी होती?, राजेश टोपे अजित पवारांच्या गटात प्रवेश करणार का? यासंदर्भात माध्यमांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी या भेटीबाबत बोलण्यास नकार दिला. यामुळे या भेटीत काय चर्चा झाली त्याची माहिती अजून समोर आली नाही. मात्र, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवायला सुरुवात झाली, एवढं नक्की.