पुणे : पुणे लोकसभेसाठी महायुतीकडून मुरलीधर मोहोळ तर महाविकास आघाडीकडून कॉंग्रसचे रवींद्र धंगेकर यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाकडून जोरदार प्रचार सुरु आहे. अशातच आज मोहोळ यांच्या प्रचारासाठी पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. विशेष बाब म्हणजे, शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत.
काय म्हणाले राज ठाकरे?
शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यापासून महाराष्ट्रात जातीपातीचं विष कालवलं गेलं असा आरोप राज ठाकर यांनी केला आहे. तसेच पुण्यात राम गणेश गडकरींचा पुतळा हटवण्यात आला. अनेकांना तेव्हा वाटलं होतं नितीन गडकरींचे ते नातेवाईक आहेत, म्हणून त्यांचा पुतळा हटवला. राम गणेश गडकरी कोण आहेत ते तरी माहीत आहे का? मात्र या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या आहेत. जेम्स लेनने सांगितलं होतं की मी कुठल्याही माणसाला महाराष्ट्रात भेटलो नाही. त्याआधी विष कालवून झालं होतं. असाही आरोप राज ठाकरेंनी केला आहे.
राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील काही नेते आज जनतेला जातीपातीच्या राजकारणात गुंतवून ठेवत आहेत. पण, याबाबतीत अजित पवार यांना मानलं पाहिजे. अजित पवार यांच्याशी माझे अनेक मतभेद असतील. पण या माणसाने कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. मी त्यांना अनेक वर्षांपासून बघतोय. इतके वर्ष ते शरद पवार यांच्याबरोबर राहिले. मात्र, ते कधी जातीपातीचं राजकारणात पडल्याचं मी बघितलं नाही, असं विधान राज ठाकरे यांनी यांनी यावेळी केलं.
पुढे बोलताना म्हणाले, ही पहिली निवडणूक आहे, ज्यात कोणाताही विषय नाही. या निवडणुकीचा कोणताही अजेंडा नाही. त्यामुळेच प्रत्येकजण शिव्या देत सुटला आहे. सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण नासवण्याचा प्रयत्न काही राजकीय नेत्यांकडून सुरु आहे. तसेच या निवडणुकीत कोणतेही मुद्दे नसल्याने प्रत्येकजण शिव्या देत सुटला आहे.
या नेत्यांनी जनतेला वेगळ्याच विषयांमध्ये गुंतवून ठेवलं आहे. तसेच आपला महाराष्ट्र असा कधीच नव्हता. आज तरुण देश सोडून जात आहेत. त्याला कारण म्हणजे आपल्या सभोवतालचं वातावरण. जे काही राजकीय मुद्दे असतात ते खालपर्यंत जातात आणि वातावरण गढूळ बनत जातं. त्यामुळे सभोवतालचं वातावरण चांगलं ठेवणं ही लोकप्रतिनींची जबाबदारी आहे, असं राज ठाकरे म्हणाले.