पुणे : “गावात चांगलं वातावरण करा, मत न देणाऱ्यांवर सूड उगारू नका”, असा सल्ला पुण्यातील मनसे मेळाव्यात राज ठाकरे यांनी उपस्थित सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना दिला. पुण्यातील गणेश कला क्रिडा मंदिरात पार पडलेल्या मेळाव्यात अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील आणि अन्य नेते उपस्थित होते. या मेळाव्यात मनसेचे महाराष्ट्रातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह जिल्हा अध्यक्ष आणि तालुका पातळीवरील पदाधिकारी उपस्थित होते.
“ग्रामपंचायत स्वच्छ असावी, गावातील माताभगिनींना राहावे वाटले पाहिजे, ग्रामपंचायत भ्रष्ट्राचार मुक्त असावी, असा सल्ला गाव पातळीवरील कार्यकर्त्यांना देत, राज ठाकरे यांनी ग्रामंचायतीच्या कारभारावर भाष्य केलं. जर तुम्ही गावातील वातावरण चांगले केले तर, त्या गावातून तुम्हाला कुणीही घालवू शकत नाही असा सल्लाही राज यांनी यावेळी दिला.
यावेळी गावातील सुविधांवर बोलताना त्यांनी शालेय जीवनात पाहिलेल्या भ्रष्ट ग्रामपंचायतीचा उल्लेख केला. ती म्हणजे ‘शोले’मधली रामगड. मध्यंतरी मी एका गावात गेलो होतो. तिथे अत्यंत वाईट अवस्था होती. गावात एक टाकी होती. माझ्या शालेय जीवनात मी अत्यंत भ्रष्टाचारी ग्रामपंचायत पाहिलेली ग्रामपंचायत रामगडची, माहितीय ना रामगड असे म्हणत उपस्थितांना राज यांनी प्रश्नही केला. त्यानंतर, शोले सिनेमातील रामगड असे राज ठाकरे यांनी म्हटले. त्या गावातील प्रमुख, सर्वात श्रीमंत ठाकूर त्याच्या घरात लाईट नाही. त्या गावात गेल्यावर रामगडची टाकी आठवली. कारण ठाकूरच्या घरात लाईट नाही, मग त्या टाकीत पाणी कुठून नेणार आहे?, असा मिश्कील टोला राज यांनी लगावला. तसेच, हे चित्र तुम्हाला बदलायचे आहे, असे आवाहनही राज ठाकरे यांनी उपस्थितांना केले.
राज ठाकरे देणार ५ लाखांचे बक्षीस
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातात जी ग्रामपंचायत असेल त्यातील जी सर्वात स्वच्छ ग्रामपंचायत असेल तिथे मी स्वत: येऊन ग्रामपंचायतीसाठी ५ लाखांचा निधी देईन. इतरांसारखी फक्त घोषणा करत नाही. जे तुमच्या आवाक्यात असेल त्या सर्व गोष्टी करा. गावातील नागरिकांची बैठक बोलवा. गाव स्वच्छ कसं ठेवायचे याबाबत चर्चा करा, असे राज ठाकरे म्हणाले. लोकांचे मतरुपी आशीर्वाद मिळालेत. त्यामुळे चांगले काम कायम तुमच्या हातून घडलं पाहिजे. लोकांना समाधानी ठेवा. तुम्ही इतक्या लांबून इथं आलात मला दर्शन दिले त्याबद्दल तुमचे आभारी आहे असेही राज ठाकरेंनी म्हटले.
कारसेवकांचं स्वप्न पूर्ण
२२ तारखेला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा होणार आहे. बाकीच्या भानगडीत जाऊ नका. तिथे राम मंदिर होण्यापेक्षा ज्या कारसेवकांनी तिथे जे कष्ट घेतले त्यांनी स्वप्न पाहिले ते स्वप्न २२ जानेवारीला पूर्ण होतंय म्हणून जिथे जिथे तुम्हाला शक्य होईल तिथे लोकांना त्रास न होता महाआरती करा, पूजा करावी असं आवाहनही राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केले.