सागर जगदाळे
भिगवण : बारामती लोकसभा मतदार संघाचे उमेदवार खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचाराचा भिगवण येथील भैरवनाथ मंदिर येथे शुभारंभ करत नारळ फोडण्यात आला. यावेळी शरद पवार गटाचे ओबीसी प्रदेश अध्यक्ष राज राजापुरकर, आपचे पुणे जिल्हा अध्यक्ष अमोल देवकाते, कार्याध्यक्ष इंदापुर महारुद्र पाटील, बाळासाहेब चितळकर, दादासाहेब थोरात, आप्पासाहेब गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
राज राजापूरकर म्हणाले, पुरोगामी विचाराच्या शाहु, फुले, आंबेडकर यांच्या विचारधारेवर सर्वाना बरोबर घेऊन चालणारे महाराष्ट्राचे लोकनेते शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात येऊन आम्हाला सुळे नाही, तर शरद पवार यांना संपवायचे आहे, असं विधान काही दिवसापुर्वी भाजप नेत्याने केलं. हा भाजपने आखलेला डाव सर्वसामान्य जनता कधी पुर्ण होऊ देणार नाही. याउलट जनतेचा स्वाभिमान जागृत होऊन सर्वसामान्य लोकांनी ही निवडणुक हाती घेतली आहे, असं ते म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले, सर्व पदाधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन शंभर टक्के मतदान होईल, या पध्दतीने प्रचार यंत्रणा राबवणे महत्वाचे आहे, असं मत राजापूरकर यांनी व्यक्त केले.
महारुद्र पाटील म्हणाले, ही निवडणुक लोकशाही टिकवण्याच्या दृष्टिने आणि अदृश्य शक्तीच्या मदतीने चाललेली दडपशाही वेळीच रोखण्यासाठी शरद पवार यांच्या पाठीशी ठाम उभे राहणे गरजेचे आहे, असं ते म्हणाले. यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.