पुणे : सर्वसामान्य ग्राहकांकडे थकीत असलेले वीज देयक वसुलीसाठी महावितरण कंपनीकडून धडक मोहीम राबविली जात आहे. वीजग्राहकांच्या सेवेसाठी कर्तव्य बजावणारे महावितरणचे अभियंते, अधिकारी आणि कर्मचारी सध्या कंपनीवरील आर्थिक संकटामुळे थकीत वीजदेयकांची वसुली करत आहेत. मोठी थकबाकी असल्यास ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू आहे. अनेकदा या सरकारी कामात कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण, धक्काबुक्कीचे प्रकार सहन करावे लागतात. आता कर्मचाऱ्यांना शिवीगाळ किंवा मारहाण केल्यास तुमची सुटका नाही. तुमच्यावर थेट फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
वारंवार आवाहन करूनही वीजदेयकांचा वेळेत भरणा न करणाऱ्या थकबाकीदारांचा वीजपुरवठा नियमानुसार खंडित करण्याची कारवाई सुरू आहे. महावितरणचे अभियंते, अधिकारी, कर्मचारी थकबाकीदारांकडे जाऊन वीजदेयकांची थकीत रक्कम भरण्याची विनंती करतात. मात्र, अनेकदा त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. शिवीगाळ, मारहाण करण्याचे प्रकार घडतात. आता या प्रकारांवर आळा बसणार आहे.
शासकीय कामात अडथळा आणणे, सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करणे किंवा कार्यालयांची तोडफोड करणे आदी प्रकरणांमध्ये भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांन्वये शिक्षेची तरतूद आहे. त्यानुसार संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
दरम्यान, गेल्या पाच महिन्यांत पश्चिम महाराष्ट्रात अभियंता, कर्मचाऱ्यांना मारहाण आणि धक्काबुक्की करण्याचे पुणे, सोलापूर जिल्ह्यात प्रत्येकी सहा आणि सांगलीत एक असे एकूण १३ प्रकार घडले आहेत. या प्रकरणातील १९ आरोपींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच आरोपींच्या अटकेची देखील कारवाई पोलीस विभागाकडून करण्यात आली आहे. विविध कलमांनुसार आरोपींना दोन ते १० वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे, असे महावितरणकडून सांगण्यात आले.