पुणे : पुण्याच्या तापमानात सातत्याने बदल होत आहेत. पुण्याच्या रात्रीच्या तापमानात घट झाली आहे, तर दिवसाच्या तापमानात उष्णता जाणवत आहे. १७ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत पुण्यात ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पुढील चार दिवस पुणेकर उकाड्याने हैराण होणार हे नक्की. पुण्याचे तापमान ३६ अंशांवर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज रात्रीपासून (ता. १८) सक्रिय वारे उत्तर-पश्चिम भारतात धडकण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावामुळे १७ ते २० फेब्रुवारी दरम्यान पश्चिम हिमालयीन प्रदेशात मेघगर्जनेसह हलका/मध्यम पाऊस/बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र काही भाग सोडला तर पुण्यात पावसाची शक्यता नाही. १८ ते २१ फेब्रुवारी दरम्यान अंशत: ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात १७ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०२४ दरम्यान हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती आयएमडी पुणेच्या हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांच्या एक्स हँडलवरून मिळाली.
राज्यात पावसाची शक्यता आहे; पण पुण्यात मात्र उका़डा जाणवणार आहे. पुढील ४८ तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशात काही भागात आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. ‘आयएमडी’च्या अंदाजानुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे पंजाबमध्ये १८ ते २० फेब्रुवारी, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि इतर राज्यांमध्ये १९ ते २१ फेब्रुवारी दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे.
‘आयएमडी’च्या माहितीनुसार, देशात १८ फेब्रुवारीपासून २२ फेब्रुवारीपर्यंत विविध भागांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशाच्या हवामानात पुन्हा एकदा बदल पाहायला मिळणार आहे. काश्मीर खोऱ्यातही पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, चंडीगड, लडाखमध्ये १८ ते २२ या काळात पाऊस पडण्याची शक्यता ‘आयएमडी’ने वर्तवली आहे.