पुणे: गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. रविवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत जिल्ह्यातील नऊ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात फारशी वाढ झालेली नाही, असे जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
शहर आणि परिसरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस जोरदार हजेरी लावत आहे, सकाळी कडक ऊन आणि दुपारनंतर जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. शुक्रवारपर्यंत (२४ मे) अशाच प्रकारचे अवकाळी पाऊस शहरासह जिल्ह्यात कोसळणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यात २५ धरणे आहेत, तर जिल्ह्याच्या सीमेवर उजनी हे धरण आहे. मुळशी धरणात आठ मिलिमीटर, टेमघर २५ मि.मी., वरसगाव आणि पानशेत प्रत्येकी १६ मि.मी., खडकवासला १८ मि.मी., गुंजवणी ३५ मि.मी., निरा देवघर तीन मि.मी., भाटघर १३ मि.मी. आणि नाझरे पाच मि.मी. पावसाची नोंद करण्यात आल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून प्रामुख्याने पाणीपुरवठा केला जाती. या चारही धरणांत मिळून एकूण ६.४२ अब्ज घनफूट (टीएमसी) महणजेच २२.०१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. मात्र, या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही, असेही जलसंपदा विभागाने स्पष्ट केले.