आणे : आणे परिसरात अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली. दुपारपर्यंत पावसाचे वातावरण नसल्यामुळे शेतकरी वर्गाची सोयाबीन काढणे आणि मळण्याची कामे चालू होती. कित्येक शेतकऱ्यांचे सोयाबीन काढून झाले आहे, तर काही शेतकऱ्यांचे सोयाबीन काढून मळणीचे काम सुरु आहे.
गुरुवारी (दि.१०) चार वाजण्याच्या सुमारास आणे परिसरात अचानक जोरदार पावसाने सुरुवात केली. तशी शेतकऱ्यांची सोयाबीन झाकून ठेवण्यासाठी एकच धावपळ सुरू झाली. या पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. आणे येथील आठवडे बाजारात पाणी शिरल्यामुळे व्यापारी वर्ग व ग्राहकांची मोठी धांदल उडाली. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान आळेफाटा परिसरातही जोरदार पाऊस झाला.