पुणे : दौंड रेल्वे स्थानक आता पुणे विभागाला जोडण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे पुणे परिसरातील नागरिकांना दौंड रेल्वे स्थानकांतर्गत येणाऱ्या समस्या मांडण्यासाठी सोलापूर डीव्हीजनशी पाठपुरावा करावा लागणारा त्रास आता वाचणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे अनेक वर्षांपासून लोकसभेत ही मागणी करत होत्या. त्यासाठी अनेक वर्षे त्यांनी पाठपुरावा केला. अखेर रेल्वे मंत्रालयाने दौंड रेल्वे स्थानक सोलापूर डीव्हीजनला न जोडण्यासंदर्भात परिपत्रक काढले आहे.
तर, परिपत्रकात रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे की, दौंड रेल्वे स्थानक पुणे शहर आणि पुणे विभागीय कार्यालयापासून जवळ आहे. या ठिकाणी येणाऱ्या तांत्रिक अडचणी किंवा काही इतर कामांसाठी पुण्यातील रेल्वे अधिकाऱ्यांना वेळेत दौंड स्थानकात पोहोचणे शक्य होईल. हे स्थानक पुणे विभागाला जोडावे, अशी मागणी सुळे सातत्याने सरकारकडे करत होत्या. या सततच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून दौंड स्थानक येत्या एक एप्रिल पासून पुणे विभागीय रेल्वे स्थानकाला जोडण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी अनेक वेळा पत्रव्यवहार आणि प्रत्यक्ष भेट घेऊन नकाशासहीत रेल्वे मंत्रालयाच्या लक्षात आणून दिले होते. इतकेच नाही, तर प्रत्यक्ष लोकसभेतही त्यांनी अनेक वेळा हा विषय उपस्थित केला होता. दौंडमधील हजारो कर्मचारी पुण्यात काम करतात. इतकेच नाही, तर शेतकरी आणि सर्वसामान्य दौंडकरसुद्धा बाजारपेठ आणि इतर कामांसाठी पुण्यालाच प्राधान्य देतात. याशिवाय शिक्षणासाठी शेकडो विद्यार्थ्यांचा रोज दौंड ते पुणे असा प्रवास सुरू असतो. या सर्व प्रवाशांच्या अडचणी आणि प्रश्न तातडीने सुटण्यासाठी त्यांना पुणे डीव्हीजन जवळचे आहे असे संसदेत सांगितले होते.