राहुलकुमार अवचट
यवत : यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नाथाचीवाडी येथे गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या व्यक्तीवर यवत पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. दारू तयार करण्याचे रसायन व साधने असा एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला.
नाथाचीवाडी गावच्या हद्दीतील नाथाचीवाडी-खुटबाव रस्त्याच्या बाजूला शेतजमिनीच्या शेजारी असलेल्या ओढ्याच्या कडेला चेतन गुडदावत हा नवसागर, बिये, गुळ, झाडाची साल असे मिश्रण करून विषारी हातभट्टीची दारू तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांना रसायन व साधने असा एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल येथे आढळून आला. पोलीस येण्याची चाहूल लागताच जवळ असलेल्या काटेरी झुडपात आरोपी पळून गेला. दरम्यान, चेतन गुडदावत याच्याविरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे मुंबई दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामती विभाग अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शेळके, पोलीस हवालदार महेंद्र चांदणे, अक्षय यादव, पोलीस नाईक नारायण जाधव यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस नाईक अजित इंगवले हे करीत आहेत.