राहुलकुमार अवचट
यवत : यवत पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खुटबाव गावच्या हद्दीत काही व्यक्ती कल्याण जुगार मटका खेळत असल्याची माहिती यवत पोलिसांना मिळाली. त्यानुसार छापा टाकून पोलिसांनी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला. मटका जुगाराची साधने व रोख रक्कम असा एकूण ३,३१० रूपये किंमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला.
खुटबाव गावच्या हद्दीतील इंदिरानगर येथे दोन व्यक्ती मटका जुगाराच्या साहित्यासह मुंबई मटका जुगार खेळ घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून गुरूवारी (ता. २८) पोलिसांनी अचानक छापा टाकला असता राजेंद्र यादव घोडके (वय ५०, रा. खुटबाव), राजकुमार दगडूलाल शर्मा (वय ६६, रा. बोरीपार्धी, वेताल कॉलनी) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याजवळ कल्याण मटका जुगाराची साधने व रोख रक्कम असा एकूण ३,३१० रुपये किंमतीचा माल आढळून आला.
दरम्यान, मटक्याचे सर्व पैसे गोळा करून गोटू पवार (रा. यवत) याच्याकडे जमा करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यावरून राजेंद्र यादव घोडके, राजकुमार दगडुलाल शर्मा, गोटू पवार या तिघांविरोधात यवत पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास यवत पोलीस स्टेशन करीत आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामती विभाग अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार गोविंद भोसले, पोलीस हवालदार गुरू गायकवाड, राम जगताप, महेद्र चांदणे, पोलीस नाईक निखील रणदिवे यांच्या पथकाने केली.