पुणे : खंडाळा तालुक्यातील शिरवळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत धनगरवाडी येथे सुरू असलेल्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर सातारा पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल १ कोटी १० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. ०१) करण्यात आली आहे. याप्रकरणी सातारा पोलिसांनी राजकीय पदाधिकारी, उद्योगपती, व्यापारी अशा ४४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, क्लब चालक मुन्ना शेख हा पसार झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार शेख हा कारवाईवेळी तेथेच होता. यामुळे तो कसा काय निसटला याबाबतही उलटसुलट चर्चा सुरू आहे.
विठ्ठल भिकोचा धुमाळ (रा. जोगवडे, ता. भोर, पुणे), विशाल भारत नगरे, प्रशांत रमेश जगताप, स्वप्नील विनायक जगताप, आकाश संजय जगताप (रा. सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे), राजेंद्र उत्तम तावरे, सुनील किसन मुळीक, आप्पासो लालासो सालगुडे, (रा. सांगवी ता. बारामती), लक्ष्मण गणपत गोफणे (रा. मासाळवाडी, बारामती), ब्रदीनाथ सूर्यवंशी, राम भुजूंग साठे (रा. बिबवेवाडी, पुणे), सागर एकनाथ गायकवाड (रा. कोंडापळे, ता. वेल्हा जि. पुणे), सोमनाथ बाळासो जाधव (रा. केळवडे, ता. भोर, पुणे), सुभाष गणपत गायकवाड (रा. कोथरुड पुणे), नंदु मनीराम जस्याल (रा. कात्रज, पुणे), तुकाराम साहेबराव दराडे (रा. स्वारगेट, पुणे), ज्ञानेश्वर गजानन बालपांडे (रा. सिंहगड रोड, पुणे), गोरख वसंत कांचळे (रा. नारायणपूर, जि. पुणे), सुर्यकांत हरीश्चंद्र साळुंखे (रा. नसरापूर ता. भोर, जि. पुणे), धर्मेंद्र पिसुलाल जैन (रा. भोर) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सातारच्या अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कड़कर यांना धनगरवाडीत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांचे एक पथक तयार करून छापा टाकण्यात आला. गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांनी कारवाईला सुरुवात करताच अनेकांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा टाकला होता. या कारवाईत रोख रक्कम, जुगाराचे साहित्य तसेच सुमारे २० वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसेच दारूच्या बाटल्या, मोबाईल असे साहित्यही जप्त करण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत पंचनामा होऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.