पुणे : पुमा या नामवंत कंपनीचे लोगो वापरून बनावट मालाची विक्री करणाऱ्याचा पर्दापाश करण्यास पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट क्र. २ च्या पथकाला यश आले आहे. पथकाने कात्रज जवळील आंबेगाव बुद्रुक परिसरातील निपानी वस्तीतील एका दुकानात मंगळवारी (ता. 3) छापा टाकून पर्दापाश केला आहे.
पोलिसांनी या छाप्यात तब्बल 8 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर शॉप मालकावर आंबेगाव पोलीस ठाण्यात कॉपीराईट अॅक्ट 1957 चे कलम 51,63 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात वेगवेळ्या ठिकाणी ब्रेन्डेड कंपनीचा बनावट मालाची विक्री होत आहे. अशी माहिती पुणे शहर पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे यांनी सदर गुन्हा उघडकीस आणून कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखा युनिट क्र. 2 चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रताप मानकर व त्यांच्या पथकाला दिले होते.
पोलिसांचे पथक तपास करीत असताना, आंबेगाव बुद्रुक येथील लिपाणे वस्ती येथील स्टायलॉक्स फॅशन हब या शॉपमध्ये मोठ्या प्रमाणावर पुमा या ब्रँडेड कंपनीचे लोगो वापरुन बॅग, टि शर्ट, स्पोर्ट्स शूज, स्लाईडर चप्पल, जॅकेट, ट्रॉव्हझर, बॉक्सर पॅन्ट विक्री चालू आहे. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांच्या पथकाने मंगळवारी छापा टाकला. पोलिसांनी या कारवाईत 8 लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कामगिरी सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे 1) गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक नितिन कांबळे, पोलीस अंमलदार शंकर नेवसे, अमोल सरडे, ओमकार कुंभार, संजय आबनावे, विनोद चव्हाण, पुष्पेद्र चव्हाण, साधना ताम्हाणे, विजय पवार, प्रमोद कोकणे, निखिल जाधव, गणेश थोरात व नागनाथ राख यांच्या पथकाने केली आहे.