पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशच्या राज्यव्यापी माहिती अधिकार कार्यकर्ता अधिवेशन नुकतेच पार पडले. या कार्यक्रमात यवत येथील सामाजित कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे राज्य कार्यकारणी सदस्य आणि पुणे प्राईम न्यूजचे बातमीदार राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
माहिती अधिकार कायद्याचे जनक ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण आण्णा हजारे यांच्या प्रमुख उपस्थितीत राळेगणसिद्धी येथे कार्यक्रम उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात पद्मभूषण आण्णा हजारे, माहिती अधिकार अभ्यासक, सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर, यशदाचे संशोधन अधिकारी दादू बुळे, तज्ञ प्रशिक्षक रेखा साळुंखे आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आले.
यावेळी अण्णा हजारे यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून आलेल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांना अमूल्य असे मार्गदर्शन केले. तसेच आपल्या आपल्यामध्ये पारिवारिक नाते जोडावे, अशी अपेक्षा यावेळी बोलताना व्यक्त केली. तसेच विवेक वेलणकर, दादू बुळे व रेखा साळुंखे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना माहिती अधिकार कायद्यासंदर्भात बहुमूल्य असे मार्गदर्शन केले.
राहुलकुमार अवचट हे गेल्या 9 वर्षापासून माहिती अधिकार क्षेत्रात कार्य करीत आहेत. तसेच ते अनेकांना माहिती अधिकार अर्ज, प्रथम अपील, व्दितीय अपील, तक्रार याबाबत मार्गदर्शन करत असतात. तसेच उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार मिळाल्याबद्दल राहुलकुमार अवचट यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले, तसेच हा पुरस्कार माझा नसून माहिती अधिकार कायद्याच्या प्रचार व प्रसारासाठी कार्य सुरुच राहील, प्रत्येक नागरिकांना माहिती होण्यासाठी व याचा जास्तीत जास्त वापर नागरिकांनी करावा यासाठी, यापुढे देखील प्रयत्नशील राहणार असल्याचे राहुलकुमार अवचट यांनी सांगितले.
यावेळी प्रास्ताविक माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी केले.