पुणे : पुणे लोकसभा मतदार संघात तिहेरी लढत होणार असून यामध्ये महायुतीकडून मुरलीधर मोहोळ, ‘मविआ’कडून रवींद्र धंगेकर आणि ‘वंचित’कडून वसंत मोरे अशा तगड्या नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे पुणे लोकसभा ही अटीतटीची लढत होणार असून तिघांच्या प्रचारासाठी महत्वाचे नेते मैदानात उतरणार आहेत.
अशातच आता ‘मविआ’कडून प्रचाराचे नियोजन करण्यात आलं आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचे प्रचारासाठी रोड शो होणार आहेत. तसेच शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा देखील होणार आहे, अशी माहिती महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी दिली आहे.
या लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात हे रोड शो आणि जाहीर सभा होणार आहेत. या सभांच्या मार्फत वातावरण निर्मीती केली जाणार असल्याचं रवींद्र धंगेकर यांनी सांगितलं आहे. जवळजवळ हे सगळे नेते माझ्या प्रचारासाठी पुण्यात येणार आहेत. नेत्यांच्या येण्याने या निवडणुकीत मोठा फायदा होणार आहे. शिवाय निवडणूक ही मोदींच्या विरोधात लढवली जाणार आहे. अनेकांना मोदींचं नेतृत्व मान्य नाही, त्यामुळे मोदींच्या विरोधातील लोक आम्हाला मतदान करतील, असा विश्वास रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला आहे.
पुढे बोलताना धंगेकर म्हणाले, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामागे मोठा जनाधार कायम राहिला आहे. शिवसेनेची मोठी ताकद पुणे शहरात आहे. त्यामुळे मोदींची सभा झाली तरी, काँग्रेसला मोठ्या प्रमाणात मतदान होईल. त्यादृष्टीने राहुल गांधी, प्रियंका गांधी यांचे रोड शो आणि शरद पवार यांच्या सहा विधानसभा मतदारसंघांत सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असंही रविंद्र धंगेकर म्हणाले.