पुणे : पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील पुन्हा एकदा गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींवर रॅगिंग झाल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या महिनाभरात या दोन घटना घडल्या आहेत. यातील एक विद्यार्थिनी क्ष-किरणशास्त्र विभागात पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षात शिकत असून, सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी आहे. तर, दुसरी विद्यार्थिनी भूलशास्त्र विभागात पगव्युत्तरच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. रॅगिंगचा गंभीर प्रकार घडूनही महाविद्यालय प्रशासनाकडून त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे.
रॅगिंगची पहिली घटना गेल्या महिन्यात घडली आहे. याप्रकरणी क्ष-किरणशास्त्र विभागात वैद्यकीय पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने तक्रार दिली आहे. ही विद्यार्थिनी सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी आहे. तिने तक्रार दिल्यानंतर रॅगिंग प्रतिबंधक समितीने चौकशी करून आपला अहवाल वैद्यकीय शिक्षण आयुक्तांकडे सादर केला आहे. रॅगिंगची दुसरी घटना गेल्या आठवड्यात घडली आहे. याप्रकरणी भूलशास्त्र विभागात पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने तक्रार दिली आहे. या प्रकरणी रॅगिंग प्रतिबंधक समितीने चौकशी केली आहे. आता पदव्युत्तर तक्रार समितीकडून पुढील चौकशी सुरू आहे.
ससून सर्वोपचार रुग्णालय तसेच बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय मागील काही काळापासून वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे चर्चेत आहे. महाविद्यालयात वारंवार घडणाऱ्या गैरप्रकारांमुळे त्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत आहे. गेल्या महिन्यात एक आणि मागील आठवड्यात एक अशा पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर रॅगिंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
याबाबत बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी सांगितले की, गेल्या महिन्यात रॅगिंगबाबत पदव्युत्तरच्या एका विद्यार्थिनीने तक्रार केली होती. त्याची चौकशी करून तो अहवाल वैद्यकीय शिक्षण आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. तर, दुसऱ्या प्रकरणात गेल्या आठवड्यात घडला असून, एका विद्यार्थिनीची तक्रार मिळाली आहे. परंतु, तो विभागांतर्गत वाद असून, त्याचीही चौकशी सुरू आहे.