सागर घरत
करमाळा : कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील नियोजनानुसार, कुकडी प्रकल्पातून रब्बी आवर्तन आजपासून (ता. १५) सुरू होणार असून, पाणी ७ दिवसांच्या अवधीनंतर करमाळा तालुक्यात पोहोचेल, अशी माहिती आमदार संजय मामा शिंदे यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना शिंदे म्हणाले की, रब्बी आवर्तन ४० दिवस चालणार असून, त्यामध्ये करमाळा तालुक्यात पाणी पोहोचण्यासाठी ७ दिवसांचा वहन कालावधी अपेक्षित आहे. या पाणी वाटप नियोजनानुसार करमाळा तालुक्यासाठी १०, कर्जत तालुक्यासाठी १२, श्रीगोंदा तालुक्यासाठी ८ तर नारायणगावसाठी ३ दिवस पाणी मिळेल. या पाण्यामुळे करमाळा तालुक्यातील कामोणे, जातेगाव, वीट, कोर्टी, कुंभारगाव, सावडी आदी गावांतील तलाव, बंधारे भरण्यास मदत होणार आहे.
आवर्तनाचा फायदा रब्बी हंगामातील पिकांसाठी होणार असून, जनावरांच्या तसेच माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटण्यास मदत होणार आहे.