सासवड : पुरंदर नागरी पतसंस्थेची 36 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. स्व. काकांवर सर्वांनी विश्वास ठेवून संस्था वाढवल्या त्याचप्रमाणे यापुढेही सभासदांनी संस्थेवर विश्वास ठेवून संस्थेच्या वाढीसाठी साथ आणि आशीर्वाद द्यावेत. स्व. काकांच्या स्वप्नाप्रमाणे पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेची वाटचाल नागरी सहकारी बँकेकडे सुरू आहे, असे प्रतिपादन आमदार संजय जगताप यांनी केले.
सहकारमहर्षी स्व. चंदूकाका जगताप यांनी स्थापन केलेल्या पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेची 36 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि. 01) अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सासवड येथील आचार्य अत्रेसांस्कृतिक भवन येथे संस्थेच्या अध्यक्षा आनंदीकाकी चंदुकाका जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आणि पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
सभेच्या सुरुवातीला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व चंदूकाका जगताप यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन झाले. ज्ञात अज्ञात दिवंगत नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 10 वी सीबीएसई बोर्ड परीक्षेत 91 टक्के गुण मिळवून यश संपादन केल्याबद्दल समरादित्य जगताप यांसह सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव करण्यात आला. तसेच संस्थेचे जेष्ठ कर्माचारी व वसुली अधिकारी जयेंद्र शिंदे आणि शाखाधिकारी दादा लवांडे यांचा सेवापुर्तीनिमीत्त गौरव करण्यात आला.
31 मार्च 2024 अखेर संस्थेकडे 313 कोटी 10 लाख रुपयांच्या ठेवी, 25 कोटींचे अधिकृत भागभांडवल, 12 कोटी 7 लाख 90 हजार रुपयांचा राखीव निधी, 4 कोटी 45 लाखांची स्थावर मालमत्ता, 81 कोटी 20 लाखांची गुंतवणूक, 241 कोटी 63 लाख रुपयांचे कर्ज वाटप असून संस्थेला 99 लाख 13 हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. सतत ऑडिटवर्ग” अ” असून यंदाही संस्थेने सभासदांना 10 टक्के लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थेच्या 13 शाखा सुरु असून 9 शाखा स्वतःच्या मालकीच्या इमारतीत असून पतसंस्थेचेसहकारी बँकेप्रमाणे कामकाज चालू असल्याचेही आमदार संजय जगताप यांनी सांगितले.