-बापू मुळीक
सासवड : राज्यात विधानसभा निवडणुकांची मतदान प्रक्रिया पार पडली असून आता शनिवारी दि.23 नोव्हेंबर रोजी निकाल आहे. 202 पुरंदर हवेली मतदारसंघासाठी सर्वाधिक फे-या म्हणजे 30 असणार आहेच. एका फेरीसाठी वीस मिनिटे लागणार आहे. तेव्हा दुपारी तीन पर्यंत निकाल पुरंदर हवेलीचा हाती न येता वेळ लागणार आहे. पहिल्यांदा पोस्टल मतांची मोजणी होणार आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिककली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट आणि मग ईव्हीएम मधील मतांच्या मोजणीला सुरुवात होणार आहे.
एका टेबलसाठी दोन पर्यवेक्षक, तीन सहाय्यक असे पाच मतमोजणी कर्मचारी आणि सूक्ष्म निरीक्षक नेमणूक देण्यात आला आहे. मतदार संघातील पाच मतदान केंद्राच्या व्ही व्हीपॅट मधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाते. व्ही व्हीव्हीपॅट मधील चिठ्ठीतील मते आणि ईव्हीएम वरील मतांची पडताळणी यावेळी केली जाते. सुरुवातीला टपाली मते आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट मते मोजणी होणार आहे. प्रत्येक टेबलला मतमोजणीसाठी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात.
स्ट्रॉंग रूम मधून ईव्हीएम बाहेर काढताना आणि मतमोजणी नंतर परत ठेवताना व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात येणार आहे. फेरी निहाय मोजणीची घोषणा करण्यात येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना मतमोजणी माहिती मिळावी, यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर ध्वनिशेपक लावण्यात आले आहे. तसेच ज्या ठिकाणी स्ट्रॉंग रूमला केंद्रीय सशस्त्र दल, राज्य राखीव पोलीस दल आणि स्थानिक पोलीस अशी ती स्तरीय सुरक्षा व्यवस्था असणार आहे.
दरम्यान, पुरंदर विधानसभा मतदारसंघांमध्ये 20 नोव्हेंबर रोजी 413 मतदान केंद्रांवर झालेल्या मतदानाच्या अनुषंगाने उद्या दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता नवीन प्रशासकीय इमारत सासवड या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणी कामकाजाकरिता विविध 26 पथके स्थापन करण्यात आलेली आहे. त्यामध्ये एकूण 126 अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच आवश्यक ठिकाणी पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आलेला आहे.