पुणे : नागरिकांनी पोलीस चौकीत तसेच पोलीस ठाण्यात समक्ष येऊन तक्रार दिल्यानंतर मुंढवा पोलिसांनी नियमभंग करणार्या रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. मुंढवा पोलिसांनी एकुण १५ रिक्षाचालकांवर कारवाई केली असून, त्यामध्ये ६ सिटर रिक्षांचा देखील समावेश आहे.
मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत असलेले वाहनांचे प्रमाण आणि त्यातूनच निर्माण होणारी वाहतूक समस्या व नागरिकांमध्ये घडणार्या घटना, वाद-विवादाच्या पार्श्वभूमीवर पोलीस चौकीत आणि पोलीस ठाण्यात काही जणांनी रिक्षा चालकांच्याविरूद्ध तक्रारी दिल्या होत्या. वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी नागरिकांना त्रास होत असल्याचे निदर्शनास आल्याने तत्काळ नियमभंग करणार्या रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
दरम्यान, मुंढवा पोलीस आणि वाहतूक शाखेने मुंढवा-केशवनगर परिसरात नो-पार्किंगमध्ये पार्क रिक्षा चालकांवर तसेच गणवेश परिधान न करता रिक्षा वाहतूक करणार्या तसेच इतर नियमांचे उल्लंघन करणार्या एकूण १५ रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करून २१ हजार २०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.
सर्व रिक्षा चालकांना मुंढवा पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना वाहतूक नियमांचे धडे देण्यात आले. नियमांचे उल्लंघन न करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. नागरिकांना त्रास होणार नाही, अशा ठिकाणी रिक्षा पार्क करण्यास सांगण्यात आले आहे.