पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणाचे धागेदोरे आता कऱ्हाडपर्यंत गेले आहे. पुणे पोलिसांनी कऱ्हाडमधून एकाला ताब्यात घेवून अटक केले आहे. त्याने हल्लेखोरांना पिस्तूल पुरविल्याचा संशय असून पोलीस त्यादृष्टीने तपास करत आहेत. धनंजय मारुती वटकर (रा. कऱ्हाड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. शरद मोहोळ याचा कोथरूड भागातील सुतारदार परिसरात भरदिवसा हत्या करण्यात आली होती. या खुनाच्या तपासाचे धागेदोरे आता कऱ्हाडपर्यंत पोहचले आहेत.
दरम्यान, शरद मोहोळ याचा ३ हल्लेखोरांनी गोळ्या झाडून भरदिवसा खून केला होता. या घटनेनंतर पुणे पोलिसांनी कसून तपास सुरु केला. वेगवेगळ्या ठिकाणी तपास पथके रवाना केली होती. या तपास पथकांनी पुणे ते सातारा महामार्गावर संशयित हल्लेखोरांना ताब्यात घेतलं. या गुन्ह्यात दोन वकीलांनाही अटक करण्यात आली आहे. अटकेतील संशयितांकडे चौकशी केल्यानंतर पोलिसांना आणखी काही धागेदोरे मिळाले आहेत. यामध्ये शरद मोहोळ याच्यावर गोळीबार करण्यासाठी आरोपींना पिस्तुल पुरवणारा व्यक्ती कऱ्हाडचा असल्याचं समोर आलं आहे.
पिस्तूल पुरवणाऱ्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल
पुणे पोलिसांनी कऱ्हाडातील धनंजय वटकर या आरोपीला ताब्यात घेवून अटक करण्यात आलं आहे. त्याने शरद मोहोळ याच्यावर हल्ला करण्यासाठी हल्लेखोरांना पिस्तूल पुरविल्याचा संशय आहे. त्यादृष्टीने काही महत्वाची माहितीही पोलिसांच्या हाती लागली आहे. धनंजय वाटकर याच्यावर कऱ्हाडातही यापुर्वी गुन्हे दाखल आहेत.
ओगलेवाडी येथे मार्च २०२३ मध्ये तब्बल १४ पिस्तुलांसह १० जणांना अटक केलं होतं. या गुन्ह्यात वटकर याचाही सहभाग होता. पोलिसांनी त्यालाही अटक केले होते. त्या गुन्ह्यामध्ये वटकरला जामिन मिळाला होता. जामिनावर असताना त्याने पुण्यातील शरद मोहोळ खुनात हल्लेखोरांना पिस्तुल पुरविल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आलं आहे.