पुणे : पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा जोर वाढला असून हवामान विभागाकडून पुणे जिल्ह्याला रेड अलर्टजरी करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात नागरिकांना सतर्कतेच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहे. गेले काही तास खडकवासला धरण परिसरात रिमझिम पाऊस सुरु आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून सध्या मुठा नदीच्या पात्रात वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास खडकवासला धरणातून 35,310 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु होता. परिणामी पुण्यातील डेक्कन परिसरातील पुलाची वाडी नदीलगत असलेल्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे. तसेच पुण्यातील भिडे पूल सुद्धा पाण्याखाली गेला आहे.
पुलाची वाडी नदीलगत घरांमध्ये शिरलं पाणी..
दरम्यान, पुण्यात कालपासून पाऊस सुरु आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे, काल(शनिवारी) तो 35,310 क्युसेक इतका विसर्ग सुरु होता. तसेच नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. डेक्कन परिसरातील पुलाची वाडी नदीलगत असलेल्या घरांमध्ये पाणी साचलं आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भिडे पूल आणि नदीपात्रातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून आज सुद्धा पुणे जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गरज पडल्यास पाण्याचा विसर्ग वाढवणार..
पुण्यामध्येही कालपासून पाऊस सुरू असून शहरातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात देखील रिमझिम पाऊस सुरू आहे. गरज पडल्यास पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे. खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर डेक्कन परिसरात असलेला झेड ब्रिज पाण्याखाली गेला आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. तसेच नागरिकांनी नदीपात्रात उतरु नये, असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील 24 तास पुणे शहर आणि जिल्ह्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत.
पुण्याला रेड अलर्ट
पुढील तीन ते चार दिवसांमध्ये राज्यभरात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाने पुणे, सातारा, घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली असून मराठवाडा वगळता बहुतांश भागात गुरूवारपर्यंत (29 ऑगस्ट) पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.