पुणे : पुणे शहरात हवेच्या गुणवत्तेची पातळी खालावली असून, मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले आहे. पुण्याचा एअर क्वालिटी इंडेक्स १५० वरून थेट २६३ वर पोहोचला आहे. यावर उपाययोजना म्हणून प्रदूषण कमी करण्यासाठी पुणे महापालिकेकडून बांधकाम व्यवसायिकांना आणि मेट्रो प्रशासनाला नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. राज्य प्रदूषण नियामक महामंडळाच्या आदेशानुसार पुणे महापालिकेने नोटीस पाठवल्या आहेत. कामाच्या ठिकाणी धुळीपासून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागणार आहेत, याची माहिती महापालिकेकडून नोटीसद्वारे देण्यात आली आहे.
दरम्यान, हवा प्रदूषण रोखण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता वाढवण्यासाठी गर्दीच्या चौकांमध्ये मिस्ट बेसड् फाउंटन उभारण्यात येणार आहेत. महापालिका अनेक उपाययोजना राबवणार आहे. गेले काही दिवस मुंबईसह पुण्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबई आणि पुण्यातील हवेच्या गुणवत्ता पातळीत सुधारणा झाली होती. पण, आता दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवा प्रदूषणात वाढ झाली आहे. वायू प्रदूषण कमी करण्यासंदर्भात महापालिका प्रशासना विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमधील हवेची गुणवत्ता खालवल्याचे चित्र आहे. मागील २४ तासांत राज्यातील अनेक शहरांचा हवा गुणवत्ता निर्देशांक मॉडरेट श्रेणीत घसरला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीवरुन हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, राज्यातील अनेक शहरात प्रदूषक पीएम २.३, पीएम १० च्या धुलिकणांच्या मात्रेत वाढ झाली आहे. पुण्यात ‘एनओ २’ तर जालन्यात ‘ओ ३’ प्रदूषकाची मात्रा वाढली आहे.