पुणे : पुणे तिथे काय उणे, असे म्हटले जाते. पुणेकर अनोखे संकल्प करतात आणि ते सिद्धीलाही नेतात. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील काही सायकलिस्ट रामभक्तांनी पुणे (पुरंदर) ते धनुषकोडी (रामसेतू) ही तब्बल १५०० किलोमीटरची दक्षिण भारत सायकल मोहीम आखली आणि यशस्वीरित्या पूर्णही केली. या मोहिमेत एकूण १३ सायकलिस्ट सहभागी झाले होते. क्लबच्या सदस्यांनी २५ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२४ या काळात ही मोहिम पूर्ण केली.
बहुप्रतिक्षित राम मंदिराचे उद्घाटन नुकतेच झाले. या काळात देशभरात उत्साहाचे वातावरण होते. देशभरात २२ जानेवारीचा दिवस दिवाळीप्रमाणे साजरा केला गेला. या काळात अनेक राम भक्तांनी राम मंदिरासाठी अनोखे संकल्प केले. पुण्यातील पुरंदर सायकलिस्ट क्लबच्या सदस्यांनी २५ जानेवारी ते १ फेब्रुवारी या काळात असाच एक संकल्प केला. पुणे (पुरंदर) ते धनुषकोडी (रामसेतू) ही १५०० किलोमीटरची दक्षिण भारत सायकल मोहीम त्यांनी आयोजित केली होती.
या आगळ्या-वेगळ्या मोहिमेची सुरुवात इंडो ॲथलेटिक्स सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून शिवतीर्थ-पुरंदर येथून झाली. पुणे ते सोलापूर अलमट्टी डॅम, हंपी, राजा रामदेव यांची कृष्णगिरी भूमी, करूर, मीनाक्षी मंदिर-मदुराई, रामेश्वरम ते भारत भूमीचे शेवटचे टोक असलेले रामसेतू म्हणजेच धनुषकोडी असा आठ दिवसांचा हा सायकल प्रवास होता.
पुरंदर सायकलिस्ट क्लबच्या सायकलस्वारांनी मागील चार वर्षात पुणे-पंढरपूर-पुणे, अष्टविनायक, पुणे-कन्याकुमारी, पुणे-पानिपत ते अट्टारी बॉर्डर, पुणे-गुजरात अशा लांब पल्ल्याच्या मोहीम यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त आम्ही हा संकल्प केला होता. आम्ही पुरंदर ते रामसेतू अंतर सायकलवरून पूर्ण केल्याचा आनंद असल्याचे सायकलस्वारांनी सांगितले.