पुणे : शहरात बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोठा निर्णय घेतला आहे. नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांचा थेट परवाना निलंबित करण्यात येत आहे. दररोज सरासरी तीन वाहनचालकांवर ही कारवाई झाली आहे.
मद्यप्राशन करून वाहन चालविणे, अतिवेगाने वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, हेल्मेट न परिधान करणे, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक या नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जाते. वाहतुकीच्या नियमांचा वारंवार भंग करणाऱ्या वाहनचालकांची यादी वाहतूक पोलिसांकडून आरटीओला पाठविली जाते. या वाहनचालकांचा परवाना निलंबित करावा, अशी शिफारसही करण्यात येते.
दरम्यान, पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावावर आरटीओकडून दर महिन्याच्या अखेरीस कारवाई केली जाते. त्यात पोलिसांनी दिलेल्या गुन्ह्यानुसार वाहनचालकांचा परवाना तीन ते सहा महिन्यांपर्यंत निलंबित केला जातो. गेल्या वर्षी एक हजारहून अधिक वाहनचालकांचे परवाने ३ ते ६ महिन्यांपर्यंत निलंबित करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी आरटीओकडून १ हजार ३ वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्यात आले.
आरटीओकडून परवाना निलंबित करण्यात आल्याची माहिती संबंधित वाहनचालकाला ऑनलाइन दिली जाते. परवाना निलंबनाच्या कालावधीत चालक वाहन चालविताना आढळल्यास त्याच्यावर पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करून त्यांचे वाहनही जप्त केले जाऊ शकते.
याविषयी अधिक माहिती देताना प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर म्हणाले की, बेशिस्त वाहनचालकांवर परवाना निलंबनाची कारवाई केली जाते. निलंबनाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर वाहनचालकांना पुन्हा वाहन चालविता येते. यात केवळ मद्यप्राशन करून वाहन चालविण्याच्या गुन्ह्याचा अपवाद आहे. त्यांना वाहनाची तंदुरुस्ती तपासणी आणि वाहन चालविण्याची चाचणी पुन्हा द्यावी लागते. त्यानंतर त्यांना पुन्हा परवाना मिळू शकतो.
वाहतूक नियमांचा वारंवार भंग करणाऱ्या वाहनचालकांवर अंकुश राहावा, यासाठी परवाना निलंबित करण्याची शिफारस वाहतूक पोलिसांनी आरटीओकडे केली होती. तीन ते चार वेळा नियमभंग करणाऱ्यांवर ही कारवाई प्रामुख्याने करण्यात आली आहे. परवाना निलंबित झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला त्या कालावधीत वाहन चालविता येत नाही, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली.