पुणे : दक्षिण कर्नाटकापासून पूर्व विदर्भापर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम असल्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. पुणे आणि परिसरातील किमान तापमानात २ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.
उत्तरेकडे गेल्या काही दिवसांपासून बर्फ पडत असून, शून्य अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येत असल्यामुळे राज्यातही थंडी पडत आहे. राज्यात सर्वाधिक कमी किमान तापमानाची नोंद जळगावात ११ अंश सेल्सिअस झाली आहे. तर पुण्यामध्ये १३.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात, कोकणात किमान तापमानात घट होणार आहे. परिणामी थंडी अधिक जाणवणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
पुढील ५ दिवसांमध्ये पुणे आणि परिसरातील किमान तापमानात २ अंश सेल्सिअसने घट होणार आहे. त्यामुळे थंडी अधिक वाढेल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे.
पुणे शहरातील किमान तापमान
- एनडीए : १२.५
- शिवाजीनगर : १३.४
- पाषाण : १३.९
- कोरेगाव पार्क : १७.४
- मगरपट्टा : १८.६
- वडगावशेरी : १८.८