पुणे : हिवाळ्यात पुण्यातील वातावरण आल्हाददायक असते. गेल्या आठवडाभरापासून पुण्यातील तापमानात सातत्याने घट होत आहे. तर १८ डिसेंबरपासून तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुण्यातील गेल्या दोन वर्षांतील डिसेंबरच्या पूर्वार्धातील सर्वांत कमी तापमान शुक्रवारी नोंदवले गेले. त्यामुळे येत्या काही दिवसांत पुणेकरांना गुलाबी थंडीचा अनुभव घेता येणार आहे.
पुण्यात दिवाळीच्या सुमारास थंडीची चाहूल लागली होती. मात्र, त्यानंतर बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र, मिचौंग चक्रीवादळ अशा कारणांनी हवामानात सातत्याने बदल होत होते. तापमानातही वाढ झाली. मात्र, गेल्या काही दिवसांत पुन्हा किमान तापमानात घट होऊ लागली आहे. शिवाजीनगर येथे १४ अंश सेल्सिअस तापमान होते. १० डिसेंबर रोजी सरासरीपेक्षा ४ अंश सेल्सिअसने अधिक असलेले शहराचे किमान तापमान १४ डिसेंबरपर्यंत २ अंश सेल्सिअसने घटले आहे. त्याचप्रमाणे १२ ते १४ डिसेंबर दरम्यान कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट झाली. १२ डिसेंबरला कमाल तापमान ३१.४ अंश सेल्सिअस होते, तर १४ डिसेंबरला ते २८.८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले.
दरम्यान, पुढील ४८ तासांत तापमान सध्याच्या पातळीवरच राहणार आहे. १८ डिसेंबरपासून राज्यात उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव जाणवण्याची शक्यता असून, या वेळी तापमानात आणखी २ अंशांची घट होण्याची शक्यता आहे. पुणे शहरातही तापमानात घट होणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.