पुणे : राज्यभरात उन्हाचा पारा वाढला असताना शहरातही उन्हाचा चटका वाढला आहे. पुण्यात मंगळवारी तापमानात लक्षणीय वाढ झाली. शिवाजीनगर येथे मोसमातील सर्वाधिक ३७.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दिवसा आकाश निरभ्र राहिल्याने तापमान सरासरीपेक्षा अधिक होते. पुढील तीन दिवसांत शहरात ३७ ते ३८ अंशांचा उच्चांक राहण्याची शक्यता आहे. शहराचे सरासरी तापमान ३७.३ अंश सेल्सिअसवर गेले असून, लवळे येथे सर्वाधिक ४०.१ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.
मंगळवारी लवळे येथे ४०.१, लोहगाव, मगरपट्ट्यात ३७.८, चिंचवडमध्ये ३८.५ आणि पाषाणमध्ये ३७.२, शिवाजीनगरमध्ये ३७.३ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाने शहर आणि परिसरात पुढील काही दिवस हवामान कोरडे राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस तापमान चढेच राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, लवळ्यात एकीकडे कमाल तापमान सर्वाधिक असताना किमान तापमानही सर्वाधिक २४.१ अंश सेल्सिअस होते. त्या खालोखाल मगरपट्टा २२.४, चिंचवड २१.८, कोरेगाव पार्क २१.४, बालेवाडी १९.८, वडगाव शेरी १८.०, पाषाण १७.८, लवासा १७.२, शिवाजीनगर १६.५, हवेली १६.० आणि एनडीएत १५.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.
पुणे शहर आणि परिसरात सध्या आकाश निरभ्र आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांचा राज्यावर लक्षणीय परिणाम होत आहे. राज्यात वाऱ्यातूनही ओलावा मिळतो, त्यामुळे आर्द्रता वाढते. परिणामी दिवसा आणि रात्रीच्या तापमानात वाढ होत आहे, अशी माहिती आयएमडी पुण्याच्या हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिली.
दरम्यान, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पारा चढाच होता. खेडमध्ये २१.०, पुरंदरमध्ये २१.०, भोरमध्ये २०.२, आंबेगावात १९.९, इंदापुरात १९.२, लोणावळ्यात १८.१, राजगुरुनगरमध्ये १६.७, नारायणगावात १६.५ आणि शिरुरमध्ये १५.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.