पुणे: जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील डॉक्टरांना निवडणुकीच्या कामातून वगळावे, असे पत्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांना दिले आहे.
पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांना निवडणुकीचे काम दिल्यामुळे पशुधनाच्या आरोग्यावर आणि दुग्धोत्पादनावर विपरीत परिणाम होऊ नये, असे पत्रात नमूद केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध विभागांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम देण्याबाबतचे आदेश काढले आहेत.
यामध्ये जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी, सहायक पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षकांनाही आदेश देऊन निवडणुकीची जबाबदारी दिली आहे. निवडणूक आयोगाच्या जून २०२३ पत्रानुसार आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या २०१४ माहिती पुस्तकातील परिच्छेदानुसार डॉक्टर, कंपाउंडर, तसेच तांत्रिक कर्मचाऱ्यांना निवडणुकीसंबंधी कामे देण्यात येऊ नयेत, असे सांगण्यात आले आहे.