पुणे : जिल्हा परिषदेच्या कामांमध्ये मला दर्जा हवा आहे. याशिवाय कामे वेळेवर झाली पाहिजेत. कोणत्याही तक्रारी आणि कारणे चालणार नाहीत. अन्यथा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले जाईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी ठेकेदारांना दिला.
ठेकेदारांच्या प्रश्नासंदर्भात जिल्हा संघटनेच्या वतीने गजानन पाटील यांना निवेदन देण्यात आले. त्याचबरोबर लेखाशीर्ष २०५४ मधील कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिली; परंतु त्यांच्या बिलाची मंजुरी ही जिल्हा परिषदेकडून होते. त्यामध्ये वेळ जातो. तसेच निविदा प्रक्रिया, ईएमबी प्रणाली तसेच कार्यपद्धतीबाबत या वेळी चर्चा करण्यात आली. प्रलंबितबाबत यादी दिल्यास ती देण्याची कार्यवाही केली जाईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
या वेळी झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या कामांच्या दर्जाबाबतचा मुद्दा गजानन पाटील यांनी उपस्थित केला. कामे वेळेवर आणि दर्जेदार झाली पाहिजेत, त्यामध्ये तडजोड केली जाणार नाही. त्याचबरोबर कामासंदर्भात तक्रारी येता कामा नये. तुम्ही चांगली कामे केली तर अधिकचा निधी जिल्हा परिषदेकडे घेऊ. अन्यथा संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई केली जाईल. यापूर्वी जिल्हा परिषदेची काही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गेलेली आहेत.
वेळप्रसंगी आणखी काही कामे त्यांना करायला देऊ, असा इशारादेखील पाटील यांनी दिला, काम पूर्ण केल्यानंतर ज्या ग्रामपंचायतीकडे बिल थकीत आहे. अशा ग्रामपंचायतींची आणि कामांची यादी ठेकेदार संघटनेने द्यावी, ती बिले देण्याची व्यवस्था केली जाईल, प्रसंगी ग्रामपंचायतीवर देखील कारवाई करू, असे पाटील यांनी स्पष्ट केले.