पुणे : गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या पदोन्नती, नियुक्त्यांचा विषय जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने अखेर मार्गी लावला आहे. मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख संवर्गातून विस्तार अधिकारीपदी पदोन्नती तर शिक्षक सेवकांच्या नियुक्तीचे आदेश जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आले. मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख संवर्गातून २९ जणांची विस्तार अधिकारीपदी पदोन्नती करण्यात आली आहे. तर, प्रलंबित असलेल्या पेसा अंतर्गतच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील दुर्गम भागातील कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये ४२ शिक्षण सेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच इतर जिल्ह्यातून पुण्यात बदली होऊन आलेल्या ३८ शिक्षकांना देखील नियुक्ती आदेश देण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिली.
‘पेसा’ अंतर्गत असलेल्या दुर्गम भागातील शाळांमधील शिक्षकांची अपुरी संख्या असल्याने वारंवार शिक्षक देण्याची मागणी लोकप्रतिनिधींसह नागरिकांकडून होत होती. या भागातील मुलांच्या शिक्षकांवर त्याचा परिणाम देखील होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. नव्याने नियुक्ती झालेल्या ४२ शिक्षण सेवकांमुळे शाळांना शिक्षक उपलब्ध झाले आहेत. दरम्यान, शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी विविध संस्थांकडून जिल्हा परिषदेकडे सतत पाठपुरावा सुरू होता. त्यानंतर ज्या शिक्षकांचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले, अशा ३८ जणांची विस्तार अधिकारीपदी पदोन्नती करण्यात आली आहे. तर, ऐन सणासुदीच्या काळात जिल्हा परिषदेने आदेश जारी केल्याने शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.