भोर : भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात निरा-देवघर धरणात एका व्यक्तीने उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना रविवार १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. श्रीकांत जाधव (रा. धनकवडी, पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने ११२ या क्रमांकावर फोन केला की, एका व्यक्तीने वरंधा घाटातील वारवंड गावा जवळील नीरा-देवघर धरणात आत्महत्या केली आहे. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता संबंधित व्यक्तीचे नाव श्रीकांत जाधव असल्याचे निदर्शनास आले आहे. श्रीकांत हा रविवारी त्याची कार घेवून वरंधा घाटातील वारवंड येथील धरणाजवळ आला. धरणाजवळ आल्यानांतर त्याने त्याच्या पत्नीला फोन करून मी आत्महत्या करणार आहे असे सांगितले होते.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांच्या सोबत भोरचे नायब तहसीलदार आदिनाथ गाजरे, मंडळाधिकारी रूपाली गायकवाड, वारवंडचे पोलीस पाटील सुधीर दिघे आणि भोरमधील भोईराज जलआपत्ती व्यवस्थापन केंद्राचे कार्यकर्ते देखील होते.
त्यांना वरंधा घाटातील वारवंड गावच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला कार उभी दिसली. मात्र, त्यामध्ये कोणीही नव्हते. त्यांनी त्यापुढे पाच-सहा किलोमीटर अंतरावरील परिसर पिंजून काढला. अखेर दोन तासांनी त्यांनी नवलाई पूल परिसरातुन धरणाच्या पाण्यातील श्रीकांत जाधव यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. पुढील तपास भोर पोलीस करीत आहेत.