पुणे : पुण्यातील लोहगाव विमानतळाच्या टर्मिनलचे उद्घाटन रविवारी होत आहे. पुणेकरांना विमानतळाची प्रतीक्षा होती. मात्र, ही प्रतीक्षा आता संपणार आहे. पुढील तीन वर्षांत पुण्यात नवे विमानतळ नक्की होईल. चालू वर्षात या नव्या विमानतळाच्या भूसंपादनाचे काम सुरू करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
विकसित भारत ॲम्बेसिडर, विकसित पुणे कॉन्क्लेव्ह या कार्यक्रमात शनिवारी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या वेळी बोलताना फडणवीस यांनी नव्या विमानतळाबाबत घोषणा केली. ते म्हणाले की, पुणेकर ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, त्या पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलचे काम पूर्ण झाले आहे. त्याचे उद्घाटन रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे.
पुणेकरांना पुढील तीन वर्षांत नवे विमानतळ मिळणार आहे. चालू वर्षात त्याचे भूसंपादन सुरू करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करेल. पुणे ते छत्रपती संभाजीनगर हरित महामार्ग तयार करण्यात येत आहे. त्यामुळे पुण्यापासून संभाजीनगर येथे केवळ दोन ते अडीच तासांत पोहोचता येणार आहे. मी पुण्याच्या अधिकाधिक जवळ येण्याचा प्रयत्न करतोय. मात्र, पुण्यातून निवडणूक लढविणार नाही, याची नोंद घ्यावी असे फडणवीस यांनी सांगताच एकच हशा पिकला.