Pune | पुणे : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून महिलांचे प्रश्न आणि त्यांच्या समस्या सोडविल्या जातात. महिला आयोग असल्याने महिलांना न्याय मिळणे सहज शक्य होते.
मात्र पुरुषांसाठीही असा आयोग असावा, अशा अधून मधून चर्चा रंगतात. पुरुषांना देखील त्यांचे प्रश्न, समस्या मांडायच्या असतातच की. अशातच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी रुपाली चाकणकर यांनी पुरुष आणि महिला दोघांकडूनही तक्रारी प्राप्त होतात. असा खुलासा केला आहे.
अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. ज्यात त्यांनी महिलांशी संबंधित विविध समस्या सोडवण्यासाठी महिला आयोगाच्या भूमिकेवर चर्चा केली. त्यादरम्यान महिलांप्रमाणे पुरुषही तक्रार करत असल्याची माहिती दिली आहे.
अध्यक्षपदाच्या पहिल्याच दिवशी त्यांना पहिली तक्रार एका पुरुषाकडून त्यांच्या पत्नीबाबत आली होती. महिला आयोग प्रामुख्याने महिलांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत असले तरी त्यांना पुरुषांकडूनही तक्रारी येतात. यावर त्यांनी भर दिला. त्यांनी पुढे स्पष्ट केले, की जेव्हा आयोगाला पुरुषाकडून तक्रार येते तेव्हा ते दोन्ही पक्षांना बोलावून त्यांचे समुपदेशन करतात, कारण कुटुंब संस्था हा समाजाचा पाया आहे. असे चाकणकर यांनी सांगितले.
पक्षपातीपणाच्या आरोपांबाबत चाकणकर म्हणाल्या की, राज्य महिला आयोग पक्षपाती पद्धतीने काम करत नाही. आयोगाने पक्षपातीपणाने काम केले असे म्हणणे चुकीचे आहे. भाजपच्या महिला खासदारांवर झालेल्या टीकेची आयोगाने दखल घेतल्याच्या अलीकडील घटनेचा त्यांनी उल्लेख केला.