पुणे : लग्नाचे खोटे आश्वासन देत तरुणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करून दुसऱ्याच मुलीसोबत लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार मुंढवा येथून उघडकीस आला आहे. याप्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तरूणीसोबत फसवणूकीचा प्रकार जानेवारी 2016 ते जानेवारी 2024 या कालावधीत घडला आहे.
चेतन मुट्टल (रा. मुंढवा, पुणे) असे तरूणाचे नाव आहे. त्याच्या विरोधात आयपीसी 376, 376/2/एन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोरपडी गावात राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणीने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित तरुणीची ओळख फेसबुकवर 2016 मध्ये झाली होती.
आरोपीने तरुणीला बोलण्यात गुंतवून प्रेमाच्या ओढले. तिला लग्नाचे खोटे आमिष दाखवून पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. मुलीने आरोपीकडे लग्नाबाबत वारंवार विचारणा केली. मात्र, त्याने प्रत्येकवेळेला टाळाटाळ केली. तसेच गावी जावून दुसऱ्या मुलीसोबत लग्न केले. याबाबत पीडित तरुणीला समजल्यावर आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. नंतर तिने शुक्रवारी वानवडी पोलीस ठाण्यात जाऊन तिने तक्रार दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले करीत आहेत.