पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे विविध विभागांतील रिक्त असलेल्या १११ पदांसाठी प्राध्यापकांची भरती राबविली जात आहे. १५ जानेवारीपर्यंत तब्बल ४ हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे. येत्या ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करण्यास मुदत देण्यात आली आहे. यामध्ये सुमारे ५ हजार पात्र उमेदवारांचे अर्ज प्राप्त होतील, असा अंदाज विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
विद्यापीठातील प्राध्यापक पदाच्या भरतीची अनेक उमेदवार प्रतीक्षा करत होते. नवीन वर्षाच्या सुरुवातीला उमेदवारांना अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. हजारो विद्यार्थी विद्यापीठाकडे अर्ज करणार असल्याची कल्पना विद्यापीठाला होती. त्यानुसार १५ जानेवारीपर्यंत महाराष्ट्रासह इतरही राज्यांतील उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
डॉ. सुरेश डॉ. गोसावी म्हणाले, विलिपीठाकडे आतापर्यंत ३ हजार ८९० उमेदवारांनी नोंदणी केली आहे. त्यातील ६३५ उमेदवारांनी अर्ज भरून सबमिट केले आहेत. त्यातील ४५७ उमेदवारांनी अर्जासह शुल्कही जमा केले आहे. तसेच येत्या ३१ जानेवारीपर्यंत विद्यापीठाकडे ५ हजार अर्ज जमा होण्याची शक्यता आहे. विद्यापीठाला गुणवत्ताधारक उमेदवार मिळावेत या दृष्टीने आमचा प्रयत्न असणार आहे.
यावेळी प्र-कुलगुरु डाॅ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डाॅ. विजय खरे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ. महेश काकडे उपस्थित होते. येत्या १७ तारखेला होणाऱ्या विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभाची सविस्तर माहिती देण्यात आली. राज्यपाल रमेश बैस, माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत १७ जानेवारीला पदवीप्रदान समारंभ पार पडणार आहे.
या कार्यक्रमात १ लाख ५ हजार ६५४ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे, १५ सुवर्ण पदके प्रदान केली जाणार आहेत. त्यातील माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या नावाने असलेले सुवर्णपदक नाशिकच्या अशोक सेंटर फॉर बिझनेस अँड कम्प्युटर स्टडीजच्या रिद्धी कलंत्री, तर अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील दादा पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयीतल प्राजक्ता पठाडे या विद्यार्थ्यांना प्रदान केले जाणार आहे.