Pune लोणी काळभोर, (पुणे) : राज्यात अनधिकृत बांधकामाची दस्त नोंदणी बंद असली तरी, हवेली तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय ३ बंदीला अपवाद ठरले आहे. गुरुवारी (ता. १३) दिवसभरात बेकायदा दस्तांची नोंदणी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबतचे भरभक्कम पुरावे हे पुणे प्राईम न्यूज च्या हाती लागले असून या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
अनधिकृत बांधकामांची दस्त नोंदणी…!
अनधिकृत बांधकामांची दस्त नोंदणी होत असल्याने नोंदणी वेळी भरण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्कामुळे शासनाच्या तिजोरीतही मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो. त्यामुळे या प्रश्नाकडे शासनही गांभीर्याने पाहताना दिसत नाही. यातून शासनाची दुटप्पी भूमिका दिसून येते. शासनाच्या या भूमिकेमुळे अधिकारी आणि अनाधिकृत बांधकाम मालक यांचे चांगले फावत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, दुय्यम सहाय्यक निबंधक कार्यालयातील अधिकारी चिरीमिरी घेऊन अनाधिकृत दस्त नोंदणी राजरोसपणे करून देत आहेत परंतु यांच्यावरती कोणतीही कारवाई केली जात नाही. उलट हवेली सब रजिस्टर ऑफिस ३ ला बेकायदेशीर दस्त नोंदणी सुरू असल्यामुळे येथे खूप मोठया प्रमाणावर गर्दी होताना दिसत आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकाम मधील सदनिकांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असल्याने अनधिकृत बांधकामे करणाऱ्याचे फावताना दिसत आहे.