पुणे: शहरातील वाढते अपघात, तसेच मद्याच्या नशेत वाहन चालविण्याच्या वाढत्या प्रकारांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियंत्रण विभागाने गेल्या चार महिन्यांत अडीच हजार वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली आहे. त्यापैकी ५०० जणांचे वाहतूक परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाकडे नुकताच पाठवला आहे.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या आदेशानुसार गेल्या महिनाभरापासून शहर व लगतच्या परिसरातील २७ ठिकाणी दररोज रात्री नाकाबंदी करून मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली जाते. या कारवाईसाठी सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी दररोज रात्री ११ ते पहाटे तीनपर्यंत वाहनचालकांची तपासणी केली जाते.
पोलिसांनी गेल्या चार महिन्यांत अडीच हजार मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली आहे. सर्व वाहनचालकांचे वाहन परवाने रद्द करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात ५०० वाहनचालकांचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाकडे सादर करण्यात आला आहे. उर्वरित वाहनचालकांचे परवाने रद्द करण्याचे प्रस्तावही लवकरच पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली