पुणे : वाहतुकीचे नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांची अडवणूक करुन त्यांच्याकडून चिरीमिरी उकळणाऱ्या वाहतूक पोलिसांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी इशारा दिला आहे. यापुढे जर वाहनचालकाकडून लाच घेताना आढळून आले तर त्यांच्यावर संबंधित वाहतूक पोलीस अधिकाऱ्यावर थेट खंडणीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
सध्या वाहतूक पोलींसावर कामाचा खूप ताण आहे. शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनत चाललेली आहे. जर वाहतूक पोलिसांनी नागरिकांकडून विनाकारण पैसे घेतले, तर आता पोलिसांवरच खंडणीचा गुन्हा दाखल होणार आहे. यासाठी काही कर्मचाऱ्यांची नेणूक देखील करण्यात आली आहे. पोलिसांवर वचक ठेवण्यासाठी आयुक्तांनी हे मोठं पाऊल उचललेलं आहे.
पुणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असताना वाहतूक पोलिसांकडून गाड्या उचलणे किंवा वाहन चालकांना अडवून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात पोलीस कर्मचारी मग्न असल्याचे दिसून येत आहेत. अनेकदा पोलीस चौकात न थांबता आडबाजूला थांबलेले दिसून येतात. पोलीस कर्मचारी टोळक्याने चौकात थांबून वाहन चालकांना अडवून त्यांना कायद्याची भीती दाखवून कारवाईला सुरुवात करत असलेले दिसून येते. यावेळी घाबरलेल्या वाहन चालकाकडून मोठ्या रक्कमेची मागणी करुन त्यांच्याकडून चिरीमिरी घेऊन त्यांना सोडून देतात.
शहरातील काही भागात वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांना अडवून त्यांच्याकडून चिरीमिरी घेतानाचे व्हिडिओ सोशल मिडीयात व्हायरल झाले आहेत. या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. यामुळे पैशाची मागणी करणा-या वाहतूक पोलिसांवर आता वचक बसणार आहे.
पोलिसांवर वचक ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काही कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. हे पोलीस कर्मचारी साध्या वेशात वाहन चालक म्हणून शहराच्या वेगवेगळ्या भागात फिरणार असल्याचे सांगितले आहे. वाहतूक पोलीस नागरिकांवर कारवाई करताना चिरीमिरी घेतात का? त्यांच्याकडे पैशांची मागणी करतात का? याची या पथकाकडून पाहणी केली जणार आहे. गैरप्रकार आढळून आल्यास तात्काळ संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यावेळी सांगितले.