लोणी काळभोर: पुणे-सोलापूर महामार्गावर (Pune Traffic) वाहतूक पोलिसांच्या गलथान (Pune News) कारभारामुळे शुक्रवारी (ता. 07) सायंकाळी सात वाजल्यापासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना तासन्तास रांगेत अडकून रहावे लागत आहे. वाहतूक नियंत्रणासाठी नियुक्त पोलिसांचा गलथान कारभार आणि नियोजनाचा अभाव यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची तीव्र नाराजी नागरिकांनी व वाहनचालकांनी व्यक्त केली आहे.

महामार्गावरील शेवाळेवाडी पासून ते लोणी काळभोर परिसरात दोन्ही बाजुंनी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. काही ठिकाणी 5 ते 7 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. कार्यालयीन व कंपनीतून घरी निघालेल्या कामगारांना, नोकरदारांना वाहतूक कोंडी झाल्याने मोठे हाल सुरू आहेत.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्यासाठी असलेल्या ठिकाणी नसल्याने अनेक वाहन चालक दुभाजकावरून वाहने वळवत असल्याने तसेच कंटेनर व मालवाहतूक वाहनांचा अडथळा यामुळे मार्ग अडवला गेला. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेसे वाहतूक पोलीस नसल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.
या कोंडीमुळे रुग्णवाहिका, प्रवासी वाहने या सर्वांना मोठा त्रास सहन करावा लागला. काही वाहनचालकांनी सोशल मीडियावरून वाहतूक विभागाच्या निष्काळजीपणाचा निषेध नोंदवला आहे. याबाबत वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी हिम्मत जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वाहतूक कोंडी नसल्याचा दावा केला आहे. दरम्यान, वारंवार होणाऱ्या अशा कोंडींमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून, नागरिक वाहतूक पोलिसांवर संताप व्यक्त करीत आहेत.







