पुणे : हॉटेलमध्ये राहत असलेल्या जोडप्याला पोलीस कर्मचाऱ्यानेच ब्लॅकमेल केल्याचा आणि धमकावल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. संदिप वसंत शिंदे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात हॉटेलमध्ये राहणाऱ्या जोडप्याला पोलीस कर्मचाऱ्याने ब्लॅकमेल केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी एका तरुणाने कोरेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांनंतर धमकी देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे. तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार, हा सगळा प्रकार १९ जुलैपासून घडला.
फोन आणि एसएमएस करून ब्लॅकमेल..
पुण्यातील उच्चभ्रू भाग म्हणून असलेल्या कोरेगाव पार्क लेन नंबर 5 मध्ये असलेल्या एका हॉटेलमध्ये एक जोडपे राहण्यासाठी आले होते. हॉटेलमध्ये रूम बुकिंगसाठी त्यांनी काही कागदपत्रे दिली होती. ही कागदपत्रे संदिप शिंदे या पोलीस कर्मचाऱ्याने हॉटेल मॅनेजरकडून घेतली. त्यानंतर त्याने संबंधित व्यक्तीस फोन आणि एसएमएस करून ब्लॅकमेल करायला सुरुवात केली.
या ब्लॅकमेलिंगनंतर पिडीत तरुणाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस उपयुक्त स्मार्तना पाटील यांनी कोरेगाव पोलिस ठाण्यातील पोलीस कर्मचारी संदिप शिंदे याचे तत्काळ निलंबन केले आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत. सुरू आहे.