ओतूर (पुणे) : येथील नगर-कल्याण महामार्गावरील जुन्नर तालुक्यातील कोळवाडी गावच्या हद्दीत मंगळवारी (ता.21) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ओतुरकडून कल्याण दिशेने जाणारी कार (एमएच 16 एटी 9426) व कल्याणकडून ओतूरच्या दिशेने जाणारा टेम्पो (एमएच 14 एचजी 4991) या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. यावेळी चारजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
या अपघातात सचिन भानुदास बेरड (वय-34), अश्विनी सचिन बेरड (वय-40), त्रिशा सचिन बेरड (वय-03) सर्व रा. नेहरुनगर भिंगार, जि.अहमदनगर ) तर टेंम्पोचालक विजय सुरेश नाडेकर (वय-26,रा.तळेरान,ता. जुन्नर) हे जखमी झाले आहेत.
यावेळी अपघाताची माहिती मिळताच ओतुरचे सहायक पोलीस निरीक्षक लहु थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शामसुंदर जायभाये हे घटनास्थळी तात्काळ हजर झाले. त्यानंतर जखमींना आवश्यक ती मदत करीत त्यांना आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान अपघातावेळी धडक झालेल्या दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातानंतर टेम्पो जागेवरच पलटी झाला आहे.