हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हडपसर येथील मांजरी फाटा (१५ नंबर) ते उरुळी कांचनदरम्यान मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. परिणामी, महामार्गावरील मुख्य चौकांमध्ये प्रचंड कोंडी होते. तसेच, पुणे – सोलापूर रस्त्याच्या कडेलाच विविध विक्रेते बसतात, त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. अपघात टाळण्यासाठी व गावातील नागरिक, पादचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हडपसर ते उरुळी कांचन दरम्यान उड्डाणपूल उभारण्याची मागणी पूर्व हवेलीत जोर धरू लागली आहे.
शिरूर लोकसभा व शिरूर हवेली मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाचे खासदार व आमदार आहेत. तरीही यांच्याकडून पुणे – सोलापूर महामार्गाबाबत कोणताही ठोस निर्णय घेत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, तसेच इतर पक्षाचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, या पुणे – सोलापूर महामार्गाच्या शेजारील गावात राहत आहेत. तसेच विविध मोठमोठी पदे घेऊन मिरवणारे अनेक नेते याच पुणे – सोलापूर महामार्गावरील गावात राहतात. मात्र, नागरिकांना होणारा त्रास यांना दिसत नसल्याचे वास्तविक चित्र सध्या पूर्व हवेलीत दिसून येत आहे. त्यामुळे विविध पक्षाच्या नेत्यांना हे दिसत नाही, याची खंत नागरिकांना आहे.
पुणे- सोलापूर महामार्गावर हडपसर ते उरुळी कांचनदरम्यान मांजरी बुद्रुक येथे बाजार समितीसमोर, शेवाळेवाडी, फुरसुंगी फाटा, लोणी स्टेशन, कुंजीरवाडी व उरुळी कांचन गावातील तळवाडी चौकात वाहतुकीची कोंडी होणे, ही बाब नित्याचीच झाल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
याबाबत तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. लोणी काळभोर, उरुळी कांचन ही गावे ‘शैक्षणिक हब’ म्हणून विकसित झाल्याने येथे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. या परिसरामध्ये मंगल कार्यालये अधिक असल्याने लग्नसराईच्या काळात वाहतूक कोंडी होते. उसाचा हंगाम चालू असतो, त्या काळात कोंडीत सातत्याने भर पडते.
पूर्व हवेली तालुक्यातील या भागांमध्ये विविध आस्थापने, खासगी कंपन्या, सुसज्ज दवाखाने, मोठी दुकाने, शोरूम, मॉल व शैक्षणिक संस्थांची संख्या वाढली आहेत. शहराच्या लगतचा भाग असल्याने येथील लोकसंख्याही झपाट्याने वाढली आहे. महापालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीनुसार शेवाळवाडी पर्यंतचा भाग पालिकेत समाविष्ट केला आहे.
दरम्यान, उरुळी कांचन हद्दीतील तळवाडी चौकीत अपवाद वगळता बाराही महिने अठरा तास वाहतूक कोंडी आढळून येते. या चौकात रस्त्यातच बेकायदा वाहतूक करणाऱ्या रिक्षा, मोठी वाहने, खासगी वाहने थांबतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूंचा सेवा रस्ता टपरी चालक व हातगाड्यांनी व्यापला आहे. त्यामुळे पायी चालणेही जिवावर बेतू शकते. मात्र स्थानिक दुकानदारांच्या दबावापोटी पोलिस व लोकप्रतिनिधी कारवाई करत नाही.
पार्किंग करा आणि बिनधास्त राहा..!
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कुंजीरवाडी व उरुळी कांचन येथील पुणे – सोलापूर महामार्गावर कोठेही पार्किंग करा आणि बिनधास्त राहा, असे विदारक चित्र निर्माण झाले आहे. तसेच उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढत आहे. दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात दुकाने तसेच पथारीवाले, व्यावसायिक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे खरेदीदारांची तसेच इतरांची वाहने मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजूने पार्किंग केली जातात. पार्किंग करताना वाहने अस्ताव्यस्तपणे लावली जातात. त्यामुळे जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे.
याबाबत बोलताना भारतीय जनता पार्टीचे नेते व क्षेत्रीय रेल्वे समितीचे सदस्य अजिंक्य कांचन म्हणाले, “उरुळी कांचन गाव हे स्त्याच्या दोन्ही बाजूला पसरले असल्याने दिवसभर विविध कारणांसाठी रस्ता ओलांडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गावामध्ये शाळा, महाविद्यालये व रेल्वे असल्याने महत्मा गांधी चौकातून जाणाऱ्या व येणाऱ्या गाड्यांची वर्दळ दिवसभर सुरू असते. तसेच पुणे – सोलापूर महामार्गावर वाहतूक करणाऱ्या गाड्या आकाराने मोठ्या असल्याने मुख्य रस्त्यावर होणाऱ्या कोंडीत भर पडते. तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना धोका संभवतो. यासाठी उड्डाणपूल होणे सोयीचे आहे.
याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे नेते व माजी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन म्हणाले,“उरुळी कांचनची वाढते शहरीकरण व नागरीकरणामुळे परिसराची लोकसंख्या ही दोन लाखांच्या पुढे गेली आहे. तसेच तळवाडी चौकात सिग्नलची मागणी केली होती. ती पूर्णत्वास आली, परंतु ट्राफिक कमी होण्यापेक्षा जास्त होत आहे. तसेच तळवाडी चौकातील बस थांबा हा पुढे कस्तुरी मंगल कार्यालयाजवळ करावा व जुन्या इलाईट चौकातील थांबाही पुढे घ्यावा त्यामुळे थोड्या प्रमाणात ट्राफिक कमी होण्यास मदत होईल. परंतु वाढलेले नागरीकरण व शहरीकरणाला उड्डाणपूल होणे गरजेचे आहे.
याबाबत बोलताना उरुळी कांचनचे सरपंच राजेंद्र कांचन म्हणाले, “पुणे-सोलापूर महामार्गावर होत असलेल्या वाहतूककोंडी बाबत रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये हडपसर ते कासुर्डी (ता. दौंड) पर्यंत उड्डाणपूल उभारण्याची मागणी या निवेदनात केली आहे.”
याबाबत बोलताना जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अलंकार कांचन म्हणाले, “पुणे -सोलापूर महामार्गाला अंडरपास करण्यापेक्षा उड्डाण पूल केले तर कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही. त्यामुळे पुणे व सोलापूरच्या दिशेने निघालेले प्रवाश्यांना वाहतूक कोंडीत अडकणार नाहीत त्यामुळे उड्डाणपूल गरजेचे आहे.”
याबाबत बोलताना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी विभागप्रमुख दिलीप शितोळे म्हणाले, “पुणे – सोलापूर महामार्ग हा मृत्यूचा सापळा झाला आहे. उरुळी कांचनपासून ते हडपसरपर्यत रोज अपघात होत आहे. यामध्ये काहींना मृत्युला सामोरे जावे लागत आहे तर काहीना कायमचे अपंगत्व आले आहे. त्यामुळे महामार्गावरून वाहणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेता सदर ठिकाणी उड्डाणपूल होणे गरजेचे आहे.”