लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्ग वाहतूककोंडी व अपघात या कारणांमुळे सध्या चांगलाच चर्चेत आहे. या महामार्गावरील कवडीपाट टोलनाका ते कासुर्डी फाटा या दरम्यान, रस्त्याची डागडुजी व साफसफाई सुरु आहे. तसेच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वतीने महामार्गावर लावलेले अथवा चिटकवलेले अनधिकृत फ्लेक्स काढले आहे. त्यामुळे पुणे-सोलापूर महामार्ग चकाचक झाला आहे. मात्र, या महामार्गावर पुन्हा अनधिकृत फ्लेक्स लावले तर त्यांच्यावर पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिला.
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वतीने पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हडपसर ते सोलापूर या दरम्यान, रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूकडील सर्व प्रकारची अतिक्रमणे काढण्यात येणार आहे. तत्पूर्वी प्राधिकरणाच्या वतीने रस्त्याची डागडुजी व साफसफाई सुरु आहे. या कामाची सुरूवात मागील चार दिवसांपूर्वी कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्यापासून करण्यात आली आहे.
प्राधिकरणाच्या वतीने पुणे-सोलापूर महामार्गावरील रस्त्याच्या दोन्ही बाजूचा कचरा व माती गोळा करण्यात येत आहे. तसेच महामार्गावर लावलेले अनधिकृत फ्लेक्स काढले जात आहे. त्याचबरोबर रिफ्लेक्टरवर चिटकवलेले फ्लेक्स काढून बॅरिगेट्स स्वच्छ पुसून घेण्यात येत आहेत.
पुणे-सोलापूर महामार्गावर अनेक बेकायदेशीर फ्लेक्स
पुणे-सोलापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर फ्लेक्स व होर्डिंग्ज आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूस लावण्यात आलेली होर्डिंग्ज प्रवाशांसाठी अडचणीची ठरत असून, या होर्डिंग्जमुळे प्रवाशी, पादचारी यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर कवडीपाट टोल नाका, वाकवस्ती, लोणी स्टेशन, लोणी कॉर्नर, माळी मळा, थेऊरफाटा, कुंजीरवाडी चौक, नायगाव फाटा, पेठ वाकडा पूल, सोरतापवाडी फाटा, इनामदारवस्ती, एलाईट चौक, तळवाडी चौक व खेडेकर मळा या परिसरात असंख्य अनधिकृत फ्लेक्स व होर्डिंग्ज धोकादायकरित्या लावलेले आहेत.
अनधिकृत फ्लेक्समुळे होतोय वाहतुकीस अडथळा
महामार्गावर काही ठिकाणी तर व्यवसायाची जाहिरात करणारे छोटे फ्लेक्स रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या विद्युत खांबावर अथवा रिफ्लेक्टरवर चिटकवलेले आहेत. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. सध्यातरी ही कारवाई कदमवाकवस्ती परिसरात यशस्वी सुरु आहे. मात्र, ही कारवाई तशीच पुढे चालू राहणार की नाही याकडे पूर्व हवेलीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
…तर जागा मालकावरही गुन्हा दाखल करणार
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत फ्लेक्स व होर्डिंग्ज लावले आहे. ते फ्लेक्स भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने काढले आहेत. त्यामुळे महामार्गाने मोकळा श्वास घेतला आहे. मात्र, आता महामार्गावर किंवा महामार्गालगत असे फ्लेक्स व होर्डिंग्ज लावून महामार्गाचे विद्रुपीकरण केले तर अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्यासह जागा मालकावर गुन्हा दाखल करणार आहे.
– शशिकांत चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर पोलीस ठाणे.